महापालिका शाळांवर सहस्त्रनजर!
By admin | Published: March 19, 2017 12:11 AM2017-03-19T00:11:09+5:302017-03-19T00:11:09+5:30
महापालिका शाळांना उर्जितावस्थेत आणण्यासाठी आयुक्तांनी पुढाकार घेतला असून या शाळांची आता नियमित तपासणी केली जाईल.
तपासणी पथके : भौतिकगुणवत्तेची चाचपणी
अमरावती : महापालिका शाळांना उर्जितावस्थेत आणण्यासाठी आयुक्तांनी पुढाकार घेतला असून या शाळांची आता नियमित तपासणी केली जाईल. यात शैक्षणिक गुणवत्तेसह शाळांची भौतिक गुणवत्ता तपासणी जाणार आहे.
तूर्तास महापालिकेकडे ६२ शाळा असून त्यातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता कमालीची माघारली आहे. शासन शिक्षणावर कोट्यवधी रूपयांचे निधी खर्च करत असताना महापालिका शाळांची दुरवस्था झाली आहे. शिक्षकाच्या खर्चावर कोट्यवधी रुपयांचा खर्च होत असताना शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या मात्र बोटावर मोजण्याइतपत मर्यादित आहे. आमदार आणि अन्य लोकप्रतिनिधींनी महापालिकेच्या शाळा दत्तक घेतल्या तरी परिस्थितीत बदल झाला नाही. विद्यार्थ्यांच्या अत्यल्प संख्येसोबत भौतिक सुविधांची वानवा आहे. गरीबांच्या शाळा म्हणून महापालिकेच्या शाळांना नवे नामानिधान मिळाले आहे. कोट्यवधी रुपयांचे ‘इन्फ्रास्ट्रक्चर’ धूळखात आहे. ४० पेक्षा अधिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या १ ते १० पर्यंत मर्यादित आहे. तेथे शिक्षकांना रिकाम्या बाकाकडे पाहत ‘ड्युटी’ करण्याचे भाग्य मिळाले आहे. या पार्श्वभूमिवर या शाळांत विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता तसेच शाळांची भौतिक गुणवत्ता तपासणी हाती घेण्यात आली आहे. त्यासाठी २१ अधिकाऱ्यांकडे ६२ शाळा सोपविण्यात आल्या आहेत. या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून एकदा संबंधित शाळांना भेटी देवून तेथील शैक्षणिक गुणवत्ता व शाळातील भौतिक गुणवत्ता तपासायची आहे. प्रत्येक तपासणी अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ३ शाळा देण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)
शैक्षणिक गुणवत्ता तपासणी
शालेय भिंती बोलक्या आहेत का? ज्ञानरचनावादी पद्धतीने वर्गरचना व अध्यापन आहे का? विद्यार्थ्यांना वाचन करता येते का? लेखन करता येते का? शब्दापासून वाक्य किंवा अभिव्यक्ती करता येते का? संख्यालेखन, संख्येवरील क्रिया, पाढे, घड्याळाची वेळ अचूक सांगणे, या पद्धतीने शैक्षणिक गुणवत्तेची तपासणी केली जाईल.
या मुद्यावर भौतिक तपासणी
वर्गखोली संख्या, ग्रंथालय, विद्युत व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, शौचालय, विद्यार्थी संख्या, शालेय पोषण आहार व्यवस्था, शिक्षक संख्या, शाळा कार्यालय, साफसफाई, मैदान, वेळापत्रक, शिक्षक हजेरी, शाळा व्यवस्थापन समिती, शाळेची वेळ, इमारत, शाळेची दुरूस्ती, ई-लर्निंग सुविधा, याशिवाय शाळेच्या आवारात झाडे लावण्यास पुरेसी जागा आहे का? याची तपासणी केली जाईल.