साहेब आले; बोर्ड लावून गेले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 11:03 PM2017-11-29T23:03:32+5:302017-11-29T23:04:03+5:30
‘डिजिटल व्हिलेज’ हरिसालमध्ये डिजिटलच्या नावावर केवळ खेळ मांडला असल्याचे चित्र आहे. ‘हॉटेलमध्ये आॅनलाइन पद्धतीने पैसे स्वीकारतो’ असा बोर्ड लावला आहे.
आॅनलाईन लोकमत
परतवाडा : ‘डिजिटल व्हिलेज’ हरिसालमध्ये डिजिटलच्या नावावर केवळ खेळ मांडला असल्याचे चित्र आहे. ‘हॉटेलमध्ये आॅनलाइन पद्धतीने पैसे स्वीकारतो’ असा बोर्ड लावला आहे. प्रत्यक्षात तेथे स्वाइप मशीनच नाही. शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्रातसुद्धा रोखीनेच रुग्णांकडून पैसे घेतले जात असल्याचे सत्य आहे.
हरिसाल येथे झालेल्या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी येथील पूजा रेस्टॉरेंटमध्ये फराळ केला. पैसे चुकविण्यासाठी त्यांनी हॉटेलमालक रमेश मेश्राम यांच्याकडे एटीएम कार्ड दिले. मात्र, त्यांनी नकार देत रोख रक्कम मागितली. यावेळी आंदोलनात सामील होण्यासाठी आलेले महेंद्र गैलवार, दयाराम काळे, मिश्रीलाल झारखंडे, पूजा येवले, अमोल बोरेकर, विशाल खानझोडे यांनी चौकशी केली असता, वेगळेच तथ्य समोर आले. हॉटेल संचालक मेश्राम म्हणाले, आठ ते दहा दिवसांपूर्वी बँक आॅफ महाराष्ट्रचे शाखा प्रबंधक आले होते. त्यांनी बोर्ड लावले. पण, स्वाईप मशीन दिली नाही. हा बोर्ड राहू द्या, तुम्हाला मशीन देऊ तेव्हा त्यात तुम्ही ग्राहकाजवळून रक्कम घ्यायची, ती तुमच्या खात्यात जमा होईल, असे बँकेच्या व्यवस्थापकांनी सांगितल्याचे ते म्हणाले.
हरिसाल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात बाह्यरुग्ण विभागात रुग्णांकडून रोख रक्कम घेतली जात असल्याचे चित्र आहे. येथेसुद्धा उपस्थित कर्मचाºयांकडून चिठ्ठी काढल्यावर एटीएम कार्ड दिले. ते बघून डॉक्टरसह परिचारिकेला हे येथे चालत नाही, असे स्पष्ट उत्तर मिळाले. आम्हाला ट्रेनिंग दिले; मात्र स्वाइप मशीन दिली नाही, असे म्हणीत चिठ्ठीचे पाच रुपये रोख देण्याची मागणी त्यांनी केली.