गंजलेल्या पिंपातून खाद्यतेलाची विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 11:12 PM2017-10-22T23:12:57+5:302017-10-22T23:13:08+5:30
खाद्यतेलाचे प्लास्टिकचेच नव्हे, तर टिनाच्या पिंपांचा पुनर्वापर मानवी आरोग्यास धोकादायक आहे; मात्र पैसे वाचविण्यासाठी व्यापाºयांकडून जुन्या, गंजलेल्या पिंपातून खाद्यतेलाची विक्री शहरात सर्रास केली जात आहे.
संदीप मानकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : खाद्यतेलाचे प्लास्टिकचेच नव्हे, तर टिनाच्या पिंपांचा पुनर्वापर मानवी आरोग्यास धोकादायक आहे; मात्र पैसे वाचविण्यासाठी व्यापाºयांकडून जुन्या, गंजलेल्या पिंपातून खाद्यतेलाची विक्री शहरात सर्रास केली जात आहे. काही पिंपांचा एमआयडीसीमधील तेल कंपन्या पुनर्वापर करीत असल्याची माहिती पुढे आली आहे.
तेलाचे पिंप रिकामे झाल्यानंतर इतवारा बाजारात विकले जातात. नंतर अॅकेडमिक स्कूलच्या मागे रतनगंज-काला नागोबा परिसरात धुतले जातात. इतवारा व सक्करसाथमध्ये ठोक खाद्यतेल व्यापारी आहेत. एमआयडीसीत विविध कंपन्या या व्यापाºयांना खाद्यतेल विकतात. त्यांची साठवणूक धुतलेल्या पिंपांमध्ये केली जाते. पुन्हा व्यापाºयांना विकण्याचा गोरखधंदा थाटण्यात आला आहे. स्वच्छतेसंदर्भात सर्व नियम पायदळी तुडविले जात असताना एफडीएची कारवाई मात्र शून्य आहे.
अन्न सुरक्षा मानके कायद्यानुसार, एक वेळा वापरलेल्या पिंपामध्ये खाद्यतेल भरणे व विक्री करणे नियमबाह्य आहे. तथापि, सर्व नियम धाब्यावर बसवून जुन्या पिंपामध्येच खाद्यतेलाची विक्री बाजारपेठेत करण्यात येते. या परिसरात एफडीएने धाडी टाकून तपासणी करावी व दोषी आढळणाºया व्यावसायिकांवर कारवाईचा बडगा उगारावा, अशी मागणी करण्यात येत आहे. इतवारा बाजारातून किरकोळ व्यापारी तेलाचा पिंप प्रत्येकी १० ते १५ रुपये दराने विकत घेतात. यावेळी या पिंपांना खाद्यतेल चिकटलेले असते. ज्या ठिकाणी त्यांची सफाई केली जाते, ती जागा अतिशय घाण असल्याचे सदर प्रतिनिधीच्या पाहणीत निदर्शनास आले. धुण्यासाठी अस्वच्छ पाण्याचा वापर केला जातो. काही दिवसांत धुतलेले हे पिंप पुन्हा इतवारा बाजार व सक्करसाथमध्ये मोठ्या व्यापाºयांना प्रत्येकी २० ते २५ रुपये दराने विक्री केली जाते. दररोज अशा हजारो पिंपांचा व्यापार या ठिकाणी खुलेआम चालतो. त्यामधून लाखोे रुपये कमाविले जातात. रतनगंज परिसरात या व्यवसायात २० ते ३० जण असल्याची माहिती आहे. प्रत्येक पिंप धुऊन बाजारपेठेत विक्री करण्यामागे ५ ते १० रुपये कमावितो, असे एका व्यावसायिकाने स्पष्ट केले. यासंदर्भात अन्न व प्रशासन विभागाच्या सह आयुक्तांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.
आरोग्याला हानिकारक
जुन्या पिंपांमध्ये खाद्यतेल भरून त्याची विक्री होत असेल, तर त्यामध्ये भेसळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भेसळयुक्त तेल खाणे हे आरोग्याला हानिकारक आहे. यामुळे पोटाचे विकार बळावतात, असे मत कॅन्सरतज्ज्ञ अतुल यादगिरे यांनी सांगितले.
असा होतो पिंपांचा पुनर्वापर
खाद्यतेलाचा वापर झाल्यानंतर पिंपांची विक्री इतवारातील लोहाबाजारात होते. तेथून सुस्थितीत असलेले पिंप वेगळे काढून रतनगंज परिसरात आणले जातात. डिटर्जंटने धुऊन साफ केल्यानंतर काही दिवसांनी पिंप लोहाबाजारातून ठोक व्यापारी व एमआयडीसीमधील तेल उत्पादक कारखान्यांना पाठविले जातात.