बडनेरा रेल्वे स्थानकावर अवैध खाद्यपदार्थांची विक्री
By admin | Published: May 10, 2017 12:15 AM2017-05-10T00:15:25+5:302017-05-10T00:15:25+5:30
तापत्या उन्हाचा फायदा उचलीत बडनेरा रेल्वेस्थानकावर अवैध खाद्यपदार्थ विक्रेते पाण्याच्या बाटल्या व शितपेय चढ्या भावाने विकत असल्याची ओरड प्रवाशांमध्ये आहे.
पोलिसांचे दुर्लक्ष : प्रवाशांची लूट, कारवाईची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
बडनेरा : तापत्या उन्हाचा फायदा उचलीत बडनेरा रेल्वेस्थानकावर अवैध खाद्यपदार्थ विक्रेते पाण्याच्या बाटल्या व शितपेय चढ्या भावाने विकत असल्याची ओरड प्रवाशांमध्ये आहे. याकडे रेल्वे प्रशासनासह पोलिसांचे दुर्लक्ष असल्याने त्यांचे चांगलेच फावते आहे. प्रवाशांची लूट थांबावी, अशा संतप्त प्रतिक्रिया आहेत.
बडनेरा रेल्वेस्थानक जंक्शन म्हणून परिचित आहे. येथून दर दिवसाला ४० ते ४५ प्रवाशी रेल्वे गाड्या धावतात. खास करून उन्हाळ्यात रेल्वे गाड्यांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. येथून हजारो प्रवाशी चढतात व उतरतात. गाडीतील प्रवाशींना गर्मीमुळे थंडपेय व पाण्याच्या बिसलेरी जास्त विकत घेतात. नेमका याचाच फायदा उचलीत खाद्यपदार्थ विक्रेते चढ्या भावाने त्यांच्याकडील माल प्रवाशांना विकत आहे. बिसलेरी बॉटलची किंमत १२ रूपये आहे. रेल्वेस्थानकावर ती सर्रास २० रुपयाने विकल्या जात आहे. बडनेरा रेल्वे स्थानकावर उन्हाळ्यात अवैध खाद्यपदार्थ विक्रेत्यांचा मोठा भरणा असतो. १०० च्यावर विक्रेते रेल्वे स्थानकावर असतात. अवैध खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर तसेच प्रवाशांची होत असणाऱ्या लुटीकडे मात्र रेल्वे सुरक्षा बल, रेल्वे पोलीस व रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशी चांगलाच त्रस्त आहे. प्रवाशांच्या अशा होत असणाऱ्या लुटीकडे का दुर्लक्ष होत आहे हा प्रश्न मात्र प्रवाशांना त्रस्त करणारा आहे. खाद्य पदार्थ, थंड पेय व बिसलेरीमधून प्रवाशांची होणारी आर्थिक लूट थांबवावी अशा संतप्त प्रतिक्रिया बडनेरा रेल्वे स्थानकावर प्रवाशांमध्ये आहे.
प्रवाशांनी हरकत घेतल्यास अरेरावी
प्रवाशांना चढ्या भावात बडनेरा रेल्वे स्थानकावर सर्वच वस्तू विकल्या जात आहे. एखाद्या प्रवाशाने वाढीव दराबाबत हरकत घेतल्यास त्या प्रवाशासोबत अवैध खाद्यपदार्थ विक्रेते अरेरावीची भाषा बोलत असल्याचे प्रवाशांमध्ये बोलल्या जात आहे.