लाखांच्या दुचाकींची आठ ते दहा हजारांत विक्री, गुन्हे शाखेच्या युनिट एकची कारवाई
By प्रदीप भाकरे | Published: September 14, 2023 05:18 PM2023-09-14T17:18:55+5:302023-09-14T17:20:38+5:30
चोराकडे मिळाल्या १७ चोरीच्या दुचाकी
अमरावती : शहर तथा नागपूर येथून दुचाकी चोरून त्या दुचाकींची अल्प दरात विक्री करणाऱ्या एका सराईत चोराला गुन्हे शाखेच्या युनिट एकने १३ सप्टेंबर रोजी अटक केली. त्याच्याकडून तब्बल १७ दुचाकी जप्त करण्यात आल्या. त्याचा एक साथीदार फरार आहे. मोहमद अल्तमश उर्फ अलतू मोहम्मद इकबाल (२०, रा. बिस्मिल्लानगर, अमरावती) असे अटक करण्यात आलेल्याचे तर अब्दुल तहेसीन अब्दुल फहीम उर्फ अशफान (रा. बिस्मिल्लानगर) असे फरार चोराचे नाव आहे.
अलतू नामक तरुण बिस्मिल्लानगर भागात ८ ते १० हजार रुपयांत जुन्या दुचाकी विक्री करीत असून त्याच्याजवळ कोणतीही कागदपत्रे नसल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट एकला मिळाली. त्या आधारे त्याला पठाण चौक येथून ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. चौकशीत त्याने साथीदार अब्दुल तहेसीन उर्फ अशफान याच्यासोबत अमरावती शहर व नागपूर येथून एक ते दीड महिन्यात अनेक दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्यानुसार त्याच्याकडून एकूण १७ दुचाकी जप्त करण्यात आल्यात. त्याच्याकडून राजापेठ, फ्रेजरपुरा व कोतवाली ठाण्याच्या हद्दीतील १० व नागपूर शहरातील सक्करदरा येथील १ अशा ११ दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा झाला.
यांनी केली कारवाई
ही कारवाई गुन्हे शाखेच्या युनिट एकचे पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष वाकोडे, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश झोपाटे, राजू बाहेनकर, फिरोज खान, सतीश देशमुख, दिनेश नांदे, विकास गुडदे, सुरज चव्हाण, निखिल गेडाम, निवृत्ती काकड, नीलेश येरणे, अमोल बहादरपुरे, भुषण पद्मणे, आकाश कांबळे यांनी केली