आश्चर्यच! सोनपापडीच्या नावे गुटख्याची विक्री; गोदामात ७० पोत्यात नऊ लाखांचा माल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2024 13:48 IST2024-10-07T13:47:27+5:302024-10-07T13:48:33+5:30
Amravati : टिम 'सीआययू' व खोलापुरी गेट पोलिस ठाण्याची संयुक्त कारवाई

Sale of Gutkha in favor of Sonpapadi; Goods worth nine lakhs in 70 sacks seized from a warehouse in Soappura
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : स्थानिक साबणपुरा या निवासी भागात कृष्णा नामक सोनपापडी आणि फरसान व्यवसायाच्या नावाखाली विकला जाणारा प्रतिबंधीत गुटखा व्यवसाय रविवारी सकाळी १० वाजता उघडकीस आला आहे. यात सुमारे ९ लाख १ हजार ९६० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. असून गोदामात लपवून ठेवलेले ७० मोठी पोती ताब्यात घेण्यात आली आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्तांचे सीआययू पथक व खोलापुरी गेट पोलिसांनी संयुक्तपणे केली आहे.
साबणपुरा येथील श्रीनिवास झंवर हे सोनपापडी विक्रीच्या नावे प्रतिबंधीत गुटखा विक्री करीत होते. त्याअनुषंगाने सीआययू पथकाने सापळा रचला आणि झंवर यांच्या प्रतिष्ठानावर धाडसत्र राबवून तिसऱ्या माळ्याहून प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला. या कारवाईबाबत पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाला अवगत केले होते. त्यानंतर एफडीएची चमू घटनास्थळी पोहोचली. श्रीनिवास झंवर यांनी हा प्रतिबंधित गुटखा बडनेरा येथील शेख चांद यांच्याकडून विकत घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
श्रीनिवास झंवर यांची तीन मजली इमारत आहे. इमारतीच्या पहिल्या माळावर कृष्णा सोनपापडी आणि फरसाण विक्रीचा व्यवसाय आहे, तर दुसऱ्या माळ्यावर कुटुंबाचे निवासस्थान आहे, तर तिसऱ्या माळ्यावर गुटख्याचे गोदाम आहे. बडनेरा येथील रहिवासी शेख चांद याच्याकडून श्रीनिवास झंवर हे विविध कंपन्यांचे गुटखा विकत घ्यायचे आणि साबणपुरा येथून अमरावती शहरात गुटखा विकला जात होता. रविवारी सकाळी १० वाजता सीआययू पथक प्रमुख एपीआय महेंद्र इंगळे आणि खोलापुरी गेटचे पोलिस निरीक्षक गौतम पाथारे यांनी श्रीनिवास झंवर यांच्या इमारतीवर छापा टाकला. त्यानंतर इमारतीतील विविध ठिकाणांचा शोध घेत प्रतिबंधीत ७० मोठे पोती गुटखा जप्त करण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच अन्न व औषध प्रशासनाचे निरीक्षक गजानन गोरे हे घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी जप्त गुटख्याचा पंचनामा केला. ही कारवाई पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनात खोलापुरी गेट ठाण्याचे पोलिस निरीक्षक गौतम पाथारे, सीआययू पथकप्रमुख तथा एपीआय महेंद्र इंगळे व त्यांच्या पथकातील विनय मोहोड, सुनील लासुरकर, जहीर शेख, अतुल संभे, राहुल ढंगेकर, विनोद काटकर यांनी केली आहे.
"श्रीनिवास झंवर यांच्या घरातून नऊ लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात दोन जणांची नावे समोर आली आहेत, तर आणखी अनेक आरोपींची नावे समोर येण्याची शक्यता आहे. पोलिस तपास करत आहेत."
- गौतम पाथारे, पोलिस निरीक्षक, खोलापुरी गेट