१०० अन् ५०० रुपयांच्या मुद्रांकांची विक्री व्हेंडरमार्फतच; मुद्रांक बंद होण्याची बातमी खोटी
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: October 9, 2024 05:58 PM2024-10-09T17:58:21+5:302024-10-09T17:59:06+5:30
नोंदणी महानिरीक्षकांचे पत्र : समाजमाध्यमांवरील स्टॅम्प बंदच्या अफवेला पूर्णविराम
अमरावती : समाजमाध्यमांवर अलीकडे १०० रुपयांचे मुद्रांक आता बंद करण्यात येणार याबाबतच्या पोष्ट समाज माध्यमांवर व्हायरल होत आहेत; मात्र अशा प्रकारे कोणताही शासन निर्णय झालेला नाही व या सर्व मुद्रांकाची विक्री मुद्रांक विक्रेत्यांद्वारा होत असल्याचे पत्र राज्याचे नोंदणी महानिरीक्षक तथा मुद्रांक निरीक्षक हिरालाल सोनवणेे यांनी जारी केले आहे.
आता वैयक्तिक स्वरुपाची सर्व शपथपत्र ५०० रुपयांच्या मुद्रांकावर करावी लागणार, शासनाने १०० रुपयांचे मुद्रांक बंद केले असल्याच्या पोस्ट समाजमाध्यमांद्वारा भन्नाट व्हायरल होत आहेत. त्यामुळे राज्यातील विविध मुद्रांक विक्रेता संघटना, लोकप्रतिनिधी, अखिल महाराष्ट्र मुद्रांक समिती पुणे व इतर मुद्रांक विक्रेता महासंघाद्वारा शासनाला निवेदने देण्यात आलेली आहेत.
इंग्रजांच्या काळापासून मुद्रांक विक्रेत्यांनी शासनाची सेवा करून महसुलात भर घातली आहे. या विक्रेत्यांद्वारा जनतेला सहजरित्या मुद्रांक उपलब्ध होत आहे. मुद्रांकाची छपाई बंद केल्यास हे सर्व विक्रेते बेरोजगार होतील व त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार असल्याचे नमूद करून मुद्रांक विक्रीची प्रचलित पद्धत कायम ठेवण्याची मागणी, या संघटनांद्वारा करण्यात आली होती व याकरिता काही जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर धरणे आंदोलन करण्यात आले होते. आता राज्याच्या नोंदणी महानिरीक्षकांनीच याबाबतचा खुलासा केल्याने कथित चर्चेला पूर्णविराम लागला आहे.
काय म्हणाले नोंदणी महानिरीक्षक ?
१०० व ५०० रुपयांचा मुद्रांक सद्य:स्थितीत व्यवहारात सुरू आहे. शिवाय विक्रीही मुद्रांक विक्रेत्यांमार्फतच सुरळीत सुरू आहे. त्यामुळे शासनस्तरावर १०० व ५०० रुपयांचे मुद्रांक बंद करण्याबाबत कोणताही निर्णय प्रस्तावित नाही. असे नोंदणी महानिरीक्षकांच्या पत्रात नमूद आहे. त्यामुळे समाज माध्यमांवर रंगलेल्या चर्चेला आता विराम मिळाला आहे.
"समाजमाध्यमांवर याबाबतच्या व्हायरल होत असलेल्या पोष्ट निरर्थक आहेत. १०० व ५०० रुपयांचा मुद्रांक बंद झालेला नाही. याबाबत कोणताही शासनादेश नाही. या मुद्रांकाची नियमित विक्री मुद्रांक विक्रेत्यांद्वारा सुरू आहे."
- अनिल औतकर, मुद्रांक जिल्हाधिकारी.