अकोल्यातील बनावट बिलांद्वारे चोरीच्या मोबाइलची अमरावतीत विक्री
By प्रदीप भाकरे | Published: October 9, 2023 07:07 PM2023-10-09T19:07:38+5:302023-10-09T19:08:21+5:30
२० मोबाइल जप्त, राजापेठ पोलिसांची यशस्वी कारवाई, दोघांविरूध्द गुन्हा.
अमरावती : अकोला येथील मोबाईल शाॅपीच्या नावाने बनविलेल्या बनावट बिलांद्वारे येथील एका मोबाइल शॉपी संचालकाला चोरीच्या मोबाइलची विक्री करण्यात आली. राजापेठ पोलिसांनी ९ ऑक्टोबर रोजी केलेल्या दमदार कारवाईतून त्या गोरखधंदयाचा उलगडा झाला आहे. या कारवाईत पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून मोबाइल शॉपी संचालकाकडून २० मोबाइल जप्त केले आहेत.
९ सप्टेंबर रोजी राजापेठ ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका नागरिकाच्या घरातून मोबाइल चोरीला गेला होता. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास देखील आरंभला. तपासादरम्यान तो चोरीचा मोबाइल मयूर राठोड हा वापरत असल्याची माहिती सायबर पोलीस स्टेशनकडून राजापेठ पोलिसांना देण्यात आली. त्यामुळे मयूर राठोडची चौकशी करण्यात आली. चौकशीत त्याने तो मोबाइल एका शॉपीमधून घेतल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी संबंधित मोबाइल शॉपीच्या संचालकाची चौकशी केली. चौकशीत त्याने वैभव हाडोळे व अक्षय अंभोरे या दोघांनी श्रद्धा मोबाइल, अकोला नावाचे बनावट बिल देऊन आपल्याला मोबाइल विक्री केल्याचे सांगितले. त्यानुसार त्याच्याकडून २ लाख ३३ हजार रुपयांचे २० मोबाइल जप्त करण्यात आले. या प्रकरणी वैभव व अक्षयविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध सुरू आहे.
राजापेठसह अन्य गुन्ह्यांची उकल
राजापेठ पोलिसांच्या या एकाचवेळी २० मोबाईल जप्ती कारवाईमुळे राजापेठसह अन्य पोलीस ठाण्यात नोंद मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. ही कारवाई सीपी नवीनचंद्र रेडडी, उपायुक्त विक्रम साळी, एसीपी शिवाजीराव बचाटे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार सीमा दाताळकर, पोलीस निरीक्षक पुनीत कुलट यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक गजानन काठेवाडे, रवी लिखितकर, पंकज खटे, गनराज राउत, विजय राऊत व सागर भजगवरे यांनी केली. सायबरचे पोलीस निरीक्षक गजानन तामटे यांनी देखील सहकार्य केले.