कालबाह्य खाद्यपदार्थांची विक्री, ‘एफडीए’चा नाही अंकुश
By admin | Published: April 20, 2017 12:06 AM2017-04-20T00:06:47+5:302017-04-20T00:06:47+5:30
‘मनभरी’ उत्पादनाच्या ‘सँडविच ब्रेड’मध्ये बुरशी आढळल्याची तक्रार सोमवारी अन्न व औषधी प्रशासन विभागाला प्राप्त झाली.
‘मनभरी’उत्पादकाला अभय : तक्रार दिल्यानंतरही गांभीर्य नाही
अमरावती : ‘मनभरी’ उत्पादनाच्या ‘सँडविच ब्रेड’मध्ये बुरशी आढळल्याची तक्रार सोमवारी अन्न व औषधी प्रशासन विभागाला प्राप्त झाली. मात्र, एफडीए अधिकाऱ्यांनीया तक्रारीची गांभीर्याने दखल घेतली नसून एफडीएचे कालबाह्य खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्यांना अभय तर नाही ना, अशी चर्चा परिसरात रंगू लागली आहे.
दस्तुरनगर मार्गावरील पूजा कॉलनीतील रहिवासी अमित विकासपंत सहारकर (३३) यांनी १७ एप्रिल रोजी कंवरनगरातील मनभरी प्रतिष्ठानातून ‘सुपर व्हाईट सॅन्डविच ब्रेड’चे एक पाकिट खरेदी केले. ते घरी जाऊन उघडताच पाकिटातील ब्रेड बुरशीजन्य असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यागंभीर प्रकाराची तक्रार सहारकर यांनी एफडीएकडे केली. तक्रार प्राप्त होताच एफडीए अधिकाऱ्यांनी मनभरी प्रतिष्ठानात जाऊन कालबाह्य ब्रेडविषयी चौकशी करणे अपेक्षित होते. त्यांच्या प्रतिष्ठानात आणखी कालबाह्य खाद्यपदार्थ आहेत का, याची शहानिशा एफडीएद्वारे करणे आवश्यक होते. मात्र, तसे झाले नाही. त्यामुळे तक्रारीचे गांभीर्य एफडीए अधिकाऱ्यांना नसल्याचे एकूण चित्र आहे. शहरात ग्राहकांना कालबाह्य व निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ विकणाऱ्यांना एफडीएच्या या सुस्त धोरणामुळे अधिकच बळ मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोेग्य धोक्यात येऊ शकते. एफडीएने याप्रकाराची तत्काळ दखल घेऊन कालबाह्य खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या मुसक्या आवळायला हव्यात.