विद्यापीठाच्या पदवी प्रमाणपत्र पॉकिटातून साडी, कापडाची विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:10 AM2021-06-22T04:10:30+5:302021-06-22T04:10:30+5:30
भांडार विभागाकडून पुरवठादाराला नोटीस, ५० हजार पॉकिटांचा बाजारात वापर अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या पदवी प्रमाणपत्र पॉकिटातून साडी, ...
भांडार विभागाकडून पुरवठादाराला नोटीस, ५० हजार पॉकिटांचा बाजारात वापर
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या पदवी प्रमाणपत्र पॉकिटातून साडी, कापड, टॉवेलची विक्री होत असल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली. याबाबत विद्यापीठाच्या भांडार विभागाने पदवी प्रमाणपत्र पॉकिट पुरवठादाराला नोटीस बजावली आहे.
विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचे अधिकारी अनिल काळबांडे हे १३ एप्रिल २०२१ रोजी स्थानिक गाडगेनगरातील पलाश लाईनमध्ये असलेल्या नंदिनी प्रतिष्ठानात टॉवेल खरेदीसाठी गेले असता, पदवी प्रमाणपत्र पॉकिटातून ग्राहकांना साडी, कापड, टॉवेल व अन्य साहित्य देत असल्याचे निदर्शनास आले. एवढेच नव्हे तर या प्रतिष्ठानात पदवी प्रमाणपत्र पॉकिटाचे गठ्ठे पडल्याचे दिसून आले. परिणामी हा प्रकार भांडार विभागाला पत्राद्धारे लक्षात आणून देण्यात आला. संत गाडगेबाबांचे नाव आणि पदवी प्रमाणपत्र अशा शैक्षणिकदृष्ट्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या कामी पाकीट वापरले जाणे ही बाब दुर्देवी मानली जात आहे. पदवी प्रमाणपत्राच्या पाकिटाचा कागदाचा दर्जा (जीएसएम) कमी असल्यामुळे विद्यापीठाने अस्वीकृत केले होते. मे. गाला एटंरप्रायजेसच्या संचालकाला १७ जून २०२१ रोजी नोटीस बजावून पदवी प्रमाणपत्राचा वापर करताना नियमांचे पालन न होणे, ही बाब योग्य नाही, असे नमूद केले आहे.
०००००
प्रतिपाकीट दोन रुपयांनी विकले
कागदाचा दर्जा योग्य नसल्यामुळे विद्यापीठाने पुरवठा रद्द करून ५० हजार पदवी प्रमाणपत्र पॉकिट नाकारले. त्यामुळे पुरवठादार गाला एटंरप्रायजेस यांनी विद्यापीठाने नाकारलेले पदवी प्रमाणपत्र पॉकिट बाजारात दोन रुपये किमतीने विकले. त्यामुळे हल्ली बाजारपेठेत विविध दुकानांमधून विद्यापीठाचे पदवी प्रमाणपत्र पाकिट वापरात येत असल्याचे चित्र आहे.
०००००००००००००
परीक्षा संचालकांचे दुकानावर धाडसत्र
विद्यापीठाच्या कोऱ्या पदवी प्रमाणपत्र पाकिटातून साडी, कापड, चड्डी, बनियान विक्री होत असल्याबाबत परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक हेमंत देशमुख यांनी धाडसत्र राबविले असता, नंदिनी साडी सेंटर या प्रतिष्ठानात हा प्रकार निदर्शनास आला. तेव्हा संबंधित दुकानदारालासुद्धा अशाप्रकारे पदवी पॉकेट वापरता येणार नाही, अशी नोटीस बजावण्यात आली.
०००००००००००००००
कोट
गाला नामक पदवी प्रमाणपत्र पाकिट पुरवठा करणाऱ्या एजन्सीला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे नाव चुकीच्या पद्धतीने वापर होऊ नये, यासाठी नोटीस बजावली आहे. विद्यापीठाने रिजेक्ट केलेले पाकिट पुनर्वापरासाठी विद्यापीठाच्या नावावर दुसरा कागद चिटकवून वापराबाबत कळविले आहे.
- दादाराव चव्हाण, उपकुलसचिव, भांडार विभाग