वरुडमध्ये बनावट खतांची विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 01:40 AM2019-06-12T01:40:01+5:302019-06-12T01:40:26+5:30
तालुक्यातील फत्तेपूर येथे डीएपी खताशी नामसाधर्म्य असलेल्या बनावट खताची विक्री होत असल्याचा प्रकार सोमवारी रात्री उघड झाला. तेथून बनावट खतासह दोन वाहने जप्त करण्यात आली. आरोपी पसार होण्यात यशस्वी झाले. जिल्हा कृषी विकास अधिकारी कुर्बान तडवी यांच्या नेतृत्वात तालुका कृषी विभागाने ही कारवाई केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वरूड : तालुक्यातील फत्तेपूर येथे डीएपी खताशी नामसाधर्म्य असलेल्या बनावट खताची विक्री होत असल्याचा प्रकार सोमवारी रात्री उघड झाला. तेथून बनावट खतासह दोन वाहने जप्त करण्यात आली. आरोपी पसार होण्यात यशस्वी झाले. जिल्हा कृषी विकास अधिकारी कुर्बान तडवी यांच्या नेतृत्वात तालुका कृषी विभागाने ही कारवाई केली. जप्त खताची किंमत १ लाख २७ हजार ४०० रुपये आहे.
पसार आरोपीचे नाव नीळकंठ मधुकर ढबाले (३३, रा. जलालखेडा, ता. नरखेड, जि. नागपूर, श्री मारोती इंडस्ट्रीज परमल, एमआयडीसी सावनेर, जि. नागपूर) असे नाव आहे. ढबाले याने डीएपीशी मिळतेजुळते बीएपी नावाने बनावट खत परिसरात विक्री करण्याकरिता आणले होते. आरोपीने एमएच २७ एक्स ७६५२ व एमएच १२ एलटी ९९८९ या वाहनांमध्ये बनावट खताचे एकूण १०८ पोते विक्रीकरिता आणल्याची माहिती तालुका कृषि अधिकारी उज्ज्वल आगरकर यांना मिळाली. यावरून कृषी विभागाच्या दक्षता पथकाने सोमवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास फत्तेपूर येथे जाऊन धाडसत्र राबविले. यावेळी निळकंठ ढबाले पसार झाला. दोन्ही मालवाहू वाहन ताब्यात घेऊन पंचनामा करण्यात आला तसेच वरुड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. या दोन्ही वाहनांत ‘बीएपी नवरत्न’ असे नाव असलेले श्री मारुती इंडस्ट्रीज परमल कासा ५० किलोचे ५० पोते, शक्तिमान सॉइल कंडिशनर नावाचे मायक्रो बायोटेक (एमआयडीसी सावनेर बॅच क्र. एएस१२१) चे ३० किलो वजनाचे २० पोते, चमत्कार सॉइल कंडिशनर नावाचे मायक्रो बायोटेक (एमआयडीसी सावनेर बॅच क्र. एमबीटी १२१/१७ ) चे ५० किलो वजनाचे ३८ पोते असे बनावट खत वरूड पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले. पोलिसांनी भादंविचे कलम ४२०, ३४ व खत नियंत्रण कायद्यातील सहकलमान्वये गुन्हा दाखल केला. ठाणेदार दीपक वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास एपीआय सुजित कांबळे करीत आहेत.
गोपनीय माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. बनावट बियाणे व खताची विक्री करुन शेतकऱ्यांची फसवणूक होऊ शकते. असा प्रकार कुठेही आढळून आल्यास तालुका कृषी कार्यालयाला तात्काळ माहिती द्यावी. खते, बियाणे खरेदी करताना कंपनीचे नाव, बॅच नंबर, खरेदी तारीख नमूद असलेले पक्के बिल घ्यावे.
- उज्ज्वल आगरकर, तालुका कृषी अधिकारी