खारपाणपट्ट्यात हळदीने केले शेतकऱ्याला समृद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 01:21 AM2018-05-04T01:21:01+5:302018-05-04T01:21:01+5:30

खारपाणपट्ट्यातील शेतकऱ्यांचा पारंपरिक पिके घेण्याकडेच अधिक कल असतो. परंतु वैद्यकीय व्यवसायात असलेले हाडाचे शेतकरी आशिष वानखडे यांनी पहिल्यांदाच हळदीची लागवड केली. एका एकरात हळदीने त्यांना पावणेदोन लाखांचा नफा मिळवून दिला.

Salted turmeric has made the farmer rich | खारपाणपट्ट्यात हळदीने केले शेतकऱ्याला समृद्ध

खारपाणपट्ट्यात हळदीने केले शेतकऱ्याला समृद्ध

Next
ठळक मुद्देपारंपरिक पिकांना फाटा : एका एकरात १४० क्विंटल उत्पादन

लोकमत न्यूज नेटवर्क
भातकुली : खारपाणपट्ट्यातील शेतकऱ्यांचा पारंपरिक पिके घेण्याकडेच अधिक कल असतो. परंतु वैद्यकीय व्यवसायात असलेले हाडाचे शेतकरी आशिष वानखडे यांनी पहिल्यांदाच हळदीची लागवड केली. एका एकरात हळदीने त्यांना पावणेदोन लाखांचा नफा मिळवून दिला.
भातकुली तालुक्यातील आष्टी या गावातील आशिष मधुकर वानखडे यांनी हळद पिकाची एका एकरावर लागवड केली. त्यांना ३ लाख ५० हजारांचे उत्पादन मिळविले. आष्टी हा परिसर खारपाणपट्टा म्हणून ओळखला जातो. पारंपरिक पिकांना फाटा देत जून महिन्यात त्यांनी हळदीची लागवड केली. त्यांनी १४० क्विंटल हळदीचे उत्पादन घेतले. त्यांनी सेलम जातीच्या हळदीची एका एकरात बेड पद्धतीने लागवड केली. बेणे, सिंचन, ड्रिप व पाइप लाइन यासाठी त्यांना १ लाख ७५ हजार रुपये लागवडीचा खर्च आला. तो वजा जाता निव्वळ नफा १ लाख ७५ हजार रुपये मिळाला, हा प्रयोग शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
गावातच केली विक्री
ओल्या हळदीसाठी वाशीम, वसमत, जळगाव आणि नागपूर येथील बाजार आहे. परंतु, गावातील शेतकरी लागवडीसाठी उत्सुक असल्याने आशिष वानखडे यांनी ही ओली हळद बेणे म्हणून गावातीलच शेतकऱ्यांना २ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री करीत आहे. विशेष म्हणजे, ओल्या हळदीवर प्रक्रिया केल्यास साधारणत: प्रतिक्ंिकटल आठ हजार रुपये भावाने विकली जाते. त्यांनी घेतलेल्या विक्रमी उत्पादनाने प्रेरित होऊन गावातील नऊ शेतकऱ्यांनी यंदा हळद पीक घेण्याची तयारी चालविली आहे.
गुणवत्ताही उत्कृष्ट
वानखडे यांनी एकरभरात घेतलेल्या हळदीची गुणवत्ताही अतिशय चांगली आहे. त्यांनी ओल्या हळदीची गुणवत्ता तपासणीसाठी दुर्गापूर येथील कृषी विज्ञान केंद्रात तपासणीसाठी पाठविली. हळदीतील करक्यूमीनचे प्रमाण चांगले असल्याचा निर्वाळा केव्हीकेने दिल्याचे वानखडे यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले. अंतिम अहवाल अद्याप यायचा असल्याचेही ते म्हणाले.

Web Title: Salted turmeric has made the farmer rich

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.