आत्मध्यानातून मोक्षप्राप्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 11:02 PM2018-04-15T23:02:20+5:302018-04-15T23:02:20+5:30
जगात एकच सत्य आहे आणि ते म्हणजे आत्मा, जगातील सर्व वस्तू नष्ट होतील, सृष्टीत असंख्य घडामोडी होतील, पण आत्मा हा चिरकाल टिकेल, कारण त्याला आदीही नाही आणि अंतही नसल्याचे प्रबोधन संत परमानंद महाराज यांनी येथे केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जगात एकच सत्य आहे आणि ते म्हणजे आत्मा, जगातील सर्व वस्तू नष्ट होतील, सृष्टीत असंख्य घडामोडी होतील, पण आत्मा हा चिरकाल टिकेल, कारण त्याला आदीही नाही आणि अंतही नसल्याचे प्रबोधन संत परमानंद महाराज यांनी येथे केले.
कोकमठाण येथील विश्वात्मक जंगली महाराज आश्रमातील आत्मा मालीक ध्यानपिठाच्यावतीने शहरात प्रथमच रविवारी सायंकाळी बडनेरा रोड स्थित नरेशबाबू लॉन येथे आत्मा मालिक सत्संग सोहळा पार पडला.
अनादी काळापासून आत्मसत्व चालत आलेले आहे आणि अनंत काळापर्यंत असेच चालत राहील, कारण आत्मा अमर आहे. सर्व देवांच्या उत्पत्तीपूर्वी आत्मा स्थित होता, म्हणून आपण आत्म्याची पूजा केली पाहिजे. आत्म्यावर प्रेम केले पाहिजे, तसेच क्षणभर केलेले आत्मचिंतन कितीतरी श्रेष्ठ आहे. आत्मध्यानातून मोक्ष प्राप्ती होऊ शकते, हाच उद्देश आत्मा मालिक ध्यानपिठाचा असल्याचे ते म्हणाले.
सबका मालिक आत्मा, या विषयावर सत्संगाद्वारे अमूल्य असे मार्गदर्शन उपस्थित संतांनी केले. अमरावतीमधील सत्संग न भुतो भविष्यती, असा असल्याचे ते म्हणाले. अंबानगरी संताची नगरी आहे, या संताच्या नगरीत आत्मध्यान सत्संगाचा योग ईश्वरीय शक्तीची अनुभुतीच आहे. आज प्रत्येक जिवाला सुख, आनंद हवा, मी कोण आहे, हे कळावे, यासाठी आत्मध्यान करणे आवश्यक आहे. जन्मापासून मृत्यूपर्यंत आपण आनंदाचा शोध घेतो, मात्र, खरा आनंद मिळविण्यासाठी आत्मध्यान प्राप्त करणे आवश्यक आहे. सत्संगाच्या यशस्वीतेसाठी आर.बी.अटल, संजय हरवानी, नरेंद्र भाराणी, राजेश डागा, संतोष महात्मे, सुरेश रतावा, विक्रम झंवर, विनायक ठाकरे, मेघशाम करडे, देवदत्त शर्मा, विनोद डागा, गोपाल धुत, रोहित राठी, सुधीर वाकोडे, पवन भुतडा, शुभम शेगोकार, सुभाष पावडे, अनिल सावरकर यांनी परिश्रम घेतले. या सत्संग सोहळ्यात पालकमंत्री प्रवीण पोटे, नवनीत राणा, हनुमंत भोगळे, विलास इंगोले यांच्यासह शहरातील गणमान्य नागरिकांची उपस्थिती होती.
आत्मध्यान सत्संगातील भजनामुळे मंगलमय वातावरणाची निर्मिती झाली होती. भजन सेवा मंडळाचे जगदिश चव्हाण यांनी भजन गाऊन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
बालब्रम्हचारी वृंदाचा मंत्रोपचार
आत्मध्यान करताना आत्म्याची पूजा मंत्रोपचाराने करण्यात आली. बाल ब्रम्हचारी वृंदांनी वेद मंत्र उच्चारून सत्संग सोहळ्याला सुरुवात केली. बेलोरा येथील वैभव जोशी यांच्या नेत्तृत्वात बाल देवतांनी मंत्रपुष्पांजली अर्पण केली.
विवेकानंद महाराजांचा नामस्मरणाचा मंत्र
संत महापुरुषांनी आपल्या वाणीतून सर्वांना धार्मिकतेचे ज्ञान दिले. मात्र, भक्तांनी ते ऐकण्याशिवाय काही केले नाही. संत महात्म्यांनी दिलेल्या ज्ञानाची कृती केली नाही, त्यामुळे वैराग्य प्राप्त झाले नाही. संतांनी प्रबोधन केले, मात्र, तरीही समाज परिवर्तन होत नाही, कारण संतांनी सांगितलेले केवळ ऐकत गेलो,जोपर्यंत आपण आत्म्याला जाणत नाही, तोपर्यंत परमात्मा मिळत नाही, त्यामुळे सदगुरुच्या शरण जा, नामस्मरण करा, असा संदेश विवेकानंद महाराज यांनी दिला.
सीपी दत्तात्रय मंडलिक माऊलीच्या सानिध्यात
पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी आत्मा मालीक सत्संग सोहळा आयोजित करण्यासाठी परिश्रम घेतले. माऊलीच्या सानिध्यात त्यांनी आत्मध्यानाची उपासना केल्याचे परमानंद महाराज यांनी मंचावर आवर्जून सांगितले. मंडलिक यांच्या पुढाकारानेच हा भव्यदिव्य असा सत्संग सोहळा यशस्वी झाल्याचे ते म्हणाले.