संभाजी भिडेंचं महात्मा गांधींच्या वडिलांबद्दल वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2023 01:49 PM2023-07-28T13:49:04+5:302023-07-28T13:50:57+5:30
संभाजी भिडेंची यापूर्वी चंद्रपूर येथे बैठक आयोजित करण्यात आली होती
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेचे संस्थापक व प्रमुख असलेले संभाजी भिडे नेहमीच वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असतात. कधी महिलांच्या टिकलीवरुन, तर कधी मूल जन्मावरुन, कधी कोरोनावरुन तर कधी भारतमातेवरुनही संभाजी भिंडेंनी वादग्रस्त विधान केल्याचं पाहिलं आहे. आता, महात्मा गांधींबद्दल संभाजी भिडेंनी वादग्रस्त विधान केलं आहे. महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे सांगितले जाते. पण, करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडील नसून एक मुस्लीम जमीनदार त्यांचे खरे वडील आहेत, असा खळबळजनक दावाच भिंडेंनी अमरावती दौऱ्यात बोलताना केला.
संभाजी भिडेंची यापूर्वी चंद्रपूर येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. दरम्यान, नियोजित बैठकस्थळी आंबेडकरवादी संघटनांनी आणि काहींनी विरोध केला होता. मात्र पोलिसांनी वेळीच सतर्क होत या विरोधकांना ताब्यात घेतल्याने वाद टळला. त्यानंतर, संभाजी भिडे गुरुवारी अमरावती दौऱ्यावर होते. यावेळी, संघटनात्मक कार्यक्रमात बोलताना भिडे यांनी महात्मा गांधींजींबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. बडनेरा मार्गावरील जय भारत मंगलम येथे गुरुवारी रात्री संभाजी भिडे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते.
मोहनदास हे करमचंद यांच्या चौथ्या पत्नीचे पुत्र होते. करमचंद हे ज्या मुस्लीम जमीनदाराकडे कामाला होते, त्याच जमीनदाराची मोठी रक्कम चोरून ते पळून गेले होते. त्यामुळे त्या चिडलेल्या मुस्लीम जमीनदाराने करमचंद यांच्या पत्नीलाच पळवून घरी आणले, त्यांच्याशी पत्नीसारखा व्यवहार केला. त्यामुळे करमचंद गांधी हे मोहनदास यांचे खरे वडील नसून ते त्याच मुस्लीम जमीनदाराचे पुत्र आहेत. मोहनदास यांचा सांभाळ व शिक्षणही त्याच मुस्लीम पालकाने केले असल्याचे सबळ पुरावेही उपलब्ध असल्याचा दावा यावेळी संभाजी भिडेंनी केला आहे.
दरम्यान, संभाजी भिडेंच्या या वादग्रस्त विधानाचे आज विधानसभेत पडसाद उमटले आहेत. विधानसभेत आमदार बाळासाहेब थोरात यांनी संभाजी भिडेंचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.
काय म्हणाले बाळासाहेब थोरात
संभाजी भिडे ही विकृती आहे. त्यांनी देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या संदर्भात अत्यंत अवमानकारक विधान केले आहे जे समग्र देशासाठी अत्यंत अस्वस्थ करणारे आहे. संभाजी भिडे वारंवार असं बोलतात, त्यांना पाठीशी नेमका कोण घालतो याचा शोध घेणे आवश्यक आहे. संभाजी भिडे यांचा हेतू महाराष्ट्राचे वातावरण अस्थिर करण्याचा आहे हे ओळखले पाहिजे. कोणाच्या राजकीय फायद्यासाठी ते वारंवार अशी विधाने करतात? आम्ही सभागृहात संभाजी भिडेंवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सरकारने आजच या विषयावर कारवाई करावी आणि सभागृहाला सूचित करावे. अन्यथा आम्ही शांत बसणार नाही.