अमरावती जिल्ह्यातील मोर्शी शहरात एकाच दिवशी आढळले १२ डेंग्यू रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2021 04:03 PM2021-08-07T16:03:02+5:302021-08-07T16:11:45+5:30
Amravati News मोर्शी शहर सध्या डेंगूसदृश आजाराच्या विळख्यात सापडले असून वार्ड क्रमांक १ त्रिमूर्तीनगर येथे एकाच दिवशी डेंगूचे १२ रुग्ण आढळून आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती: मोर्शी शहर सध्या डेंगूसदृश आजाराच्या विळख्यात सापडले असून वार्ड क्रमांक १ त्रिमूर्तीनगर येथे एकाच दिवशी डेंगूचे १२ रुग्ण आढळून आले. शहरात असलेली अस्वच्छता व डासांचा उद्रेक डेंग्यू आजाराला कारणीभूत असल्याचा रोष व्यक्त करीत येथील संतप्त नागरिक शुक्रवारी नगर परिषदेवर धडकले.
मोर्शी शहरात दिवसेंदिवस डेंग्यूचे रुग्ण वाढत आहेत. त्यावरील उपाययोजनांच्या मुद्द्यावर प्रशासन हतबल झाल्याचे दिसून येत आहे. त्रिमूर्तीनगर वाॅर्ड क्रमांक १ येथील १२ रुग्णांना डेंगूसदृश आजाराची लागण झाली. काही रुग्ण मोर्शी व काही रुग्ण अमरावती येथील रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.
त्रिमूर्ती नगर येथे घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याने घरोघरी डेंग्यूचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. नाल्या-गटारे तुडुंब भरली असून आजूबाजूच्या परिसरात ले-आउट व रिकामे भूखंड असून, त्यावर झाडेझुडपे, गाजरगवत मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्यामुळे सरपटणाऱ्या विषारी प्राण्यांचा मुक्त संचार व वावर परिसरात असल्याने खेळणाऱ्या लहान मुलांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. नुकताच जागतिक महामारी कोरोनाचा उद्रेक कमी झाल्याचे दिसून येत असताना आता घरोघरी डेंग्यू रुग्णांची संख्या वाढल्याने नागरिक धास्तावले आहेत. ५ ते ३० वर्षे वयोगटातील मुलांना ताप येऊन शरीरातील पेशी कमी होत आहेत. तरीसुद्धा नगर परिषद प्रशासन मात्र झोपेत असल्याचे सोंग घेत असल्याचा आरोप येथील समस्त नागरिकांनी केला आहे.
नगर परिषदेतर्फे महिन्यातून एकदा थातूरमातूर फवारणी केल्या जात असून प्रभावी उपाययोजना करण्यात मात्र नगर परिषद प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहे. कोरोना या महामारीमुळे अनेक बेरोजगार व लघु व्यवसाय करत असलेले दुकानदार यांच्या हाताला काम मिळणे दुरपास्त झाल्याने आधीच आर्थिक संकटात सापडले असताना घरात असलेल्या रुग्णांच्या उपचाराकरिता कोठून पैसे आणायचे, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा झाला आहे.
नगर परिषदेच्या मुख्याधिकारी व आरोग्य विभागाने या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन गावातील नाल्यांची साफसफाई व फवारणी करण्यात यावी. साफसफाई व फवारणीची यंत्रणा युद्धस्तरावर राबविण्यात यावी, अशी मागणी सदर व लेखी निवेदनाद्वारे नगर परिषदेकडे करण्यात आली. प्रभाग क्रमांक १ चे रहिवासी विजय भलावी, संजय गव्हाणे, अमर जाधव, नत्थूजी भलावी, मनोहर खवले, संजय नंदनवार, अजय देऊळकर, वसंतराव गाडबैल, राजेश कोळकर, मोहन वागजाडे, सूरज काकपुरे, योगेश सोनोने, भूषण सोनोणे, नीलेश नागोसे यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.