अमरावती जिल्ह्यात १४ ठिकाणी सुरू होणार वाळू डेपो
By जितेंद्र दखने | Published: May 2, 2023 06:39 PM2023-05-02T18:39:28+5:302023-05-02T18:39:53+5:30
Amravati News नव्या वाळू धोरणानुसार जिल्ह्यात १४ ठिकाणी वाळू डेपो सुरू केले जाणार असून त्यासाठी जिल्हा खनिकर्म विभागाद्वारे निविदा देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे.
जितेंद्र दखने
अमरावती : नव्या वाळू धोरणानुसार जिल्ह्यात १४ ठिकाणी वाळू डेपो सुरू केले जाणार असून त्यासाठी जिल्हा खनिकर्म विभागाद्वारे निविदा देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. यात ४४ वाळू घाटातून वाळू उपसा करून या १४ डेपोंमध्ये जमा केली जाणार आहे. तेथून नागरिकांना ६०० रुपये ब्रास प्रमाणे विक्री केली जाणार आहे.
वाळूच्या अवैध वाहतुकीसह तस्करीला आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून अनेक प्रयत्न करण्यात आले. परंतु यामध्ये तस्करी रोखणे शक्य झाले नाही. त्यामुळे ६०० रुपये ब्रास वाळू असतानाही नागरिकांना प्रतिब्रास हजारो रुपये मोजावे लागत. अवैध वाळूच्या व्यवसायाला रोखण्यासाठी आणि नागरिकांना स्वस्तात वाळू मिळावी यासाठी यावर्षी शासनाने नवे वाळूचे धोरण आणले आहे. त्यानुसार आता वाळू घाटांचे लिलाव रद्द करून वाळू डेपो तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावर्षी जिल्ह्यातील ४४ वाळू घाटांना राज्यस्तरीय समितीने मंजुरी दिली होती. नव्या वाळू धोरणानुसार जिल्ह्यात विविध ठिकाणी १४ वाळू घाट तयार करण्यात येणार आहे.
यामध्ये तिवसा,भातकुली,धामनगाव रेल्वे,मोर्शी, दर्यापूर,अचलपूर,चांदूर बाजार आणि धारणी तालुक्यातील या डेपोंचा समावेश आहे. विविध ठिकाणच्या ४४ वाळू घाटातून वाळू उपसा करून या डेपोमध्ये जमा केली जाणार आहे. या वाळू डेपोत १३४,५०६ ब्रास वाळू जमा केली जाणार आहे. ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर या डेपोतून ६०० रुपये ब्रासने खरेदी करता येणार आहे. डेपोतून ६०० रुपये ब्रासने जरी वाळू खरेदी करता येत असली तरी डेपोतून वाळू नेण्याचा खर्च नागरिकांना स्वतः करावा लागणार आहे.
मात्र त्यासाठी वाहतुकीचे दर जिल्हा प्रशासन निश्चित करणार आहे. डेपो तयार करणे, वाळू घाटातून वाळू उपसा करणे, वाळूची वाहतूक करून ती डेपोत जमा करणे आणि नागरिकांनी निश्चित तयार विक्री करणे यासाठी प्रशासनाने निविदा प्रसिद्ध केली आहे.सर्व प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन डेपो तयार केले जाणार आहेत. त्यानंतर नागरिकांना निश्चित दरात वाळू उपलब्ध करून दिली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा खनिकर्म विभागाचे सूत्रांनी दिली.
येथे होणार वाळू डेपो
तिवसा तालुक्यातील फत्तेपूर जावरा,चांदूर ढोरे, धामंत्री,भातकुलीमधील गणोरी, नावेड, धामणगाव रेल्वेतील जळगाव मंगरूळ, मोर्शीत तळणी, दर्यापूर मधील खानापूर चिपर्डा,बनोसा,अचलपूर हिवरा, निंभारी,चांदूर बाजार टोंगलापूर, तळणी पूर्णा, धारणी मधील तलई आदी ठिकाणांचा समावेश आहे.