अमरावती जिल्ह्यातील वाळूघाट बंद; स्वस्त वाळूही मिळेना
By जितेंद्र दखने | Published: May 20, 2023 07:29 PM2023-05-20T19:29:30+5:302023-05-20T19:30:39+5:30
स्वत वाळू मिळण्याची वाट बघत झोपडं टाकून राहायचं का साहेब? अंमलबजावणीत अडथळे
जितेंद्र दखने, अमरावती: अवैध वाळूच्या तस्करीला लगाम लावण्यासाठी; तसेच वाळू माफियांपासून सर्वसामान्यांची सुटका व्हावी, याकरिता राज्य शासनाने नवीन वाळू धोरणाची घोषणा केली. महिनाभरापूर्वी शासनाने या धोरणाला मान्यता दिली. आता दीड ते दोन महिने होऊनही प्रत्यक्षात स्थानिक स्तरावर नवीन वाळू धोरणाच्या अंमलबजावणीत अडथळे येत आहेत.
सध्या बांधकामांचा हंगाम सुरू असून, दरदिवशी शहर व जिल्ह्यात सुमारे १२०० ब्रास वाळू येत आहे. जिल्ह्यातील वाळूघाट सुरू असल्यानंतर वाळू सुमारे ४००० रुपये ब्रासने सर्वसामान्यांना मिळू शकली असती; मात्र जिल्ह्यातील वाळूघाट अजूनही बंद असल्यामुळे शेजारच्या मध्य प्रदेशातून येत असलेल्या वाळूसाठी ७००० रुपये ब्रासप्रमाणे पैसे मोजावे लागत आहेत. यामुळे दरदिवशी वाळू खरेदी करणारे बांधकाम व्यावसायिक, नागरिकांना सुमारे ३६ लाख रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे शासकीय वाळूघाट अद्यापही सुरू झाले नसल्याने सर्वसामान्यांना नवीन वाळू धोरणानुसार प्रतिब्रास ६०० रुपयांना मिळणारी वाळू दिवास्वप्न ठरत आहे. अशात गत वर्षभरापासून वाळूघाट बंद असल्याने कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाला आहे.
निविदा प्रक्रियेला मिळेना प्रतिसाद
राज्य शासनाच्या नवीन वाळू धोरणाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने जिल्हा खनिकर्म विभागाने जिल्हाभरातील ४४ वाळूघाटांमधून वाळू उपसा करणे व डेपोपर्यंत वाळूची वाहतूक करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली. विशेष म्हणजे सलग तीनवेळा निविदा मागविल्यानंतर ४४ पैकी केवळ ११ ठिकाणीच निविदा आल्यात. मात्र, यात तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने ही प्रक्रियासुद्धा तूर्तास थांबली आहे.
१० जूननंतर उपसा बंद
राज्य शासनाच्या धोरणानुसार दरवर्षी वाळूघाटातील उपसा १० जून ते ३० सप्टेंबरपर्यंत बंद राहतो. त्यामुळे शासनाच्या नवीन वाळू धोरणानुसार सर्वसामान्यांना ६०० रुपये प्रतिब्रास मिळणारी वाळू आता किमान ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यापर्यंत तरी मिळू शकणार नाही. परिणामी सहा ते सात हजार रुपयांनी वाळू खरेदी करावी लागणार आहे.
जिल्ह्यात ४४ वाळूघाट
जिल्ह्यातील ८ तालुक्यांत ४४ शासकीय वाळूघाट आहेत. यामध्ये जावरा फत्तेपूर, इसापूर, नमस्कारी, चांदूर ढोरे, भारवाडी (तिवसा), गणोजा देवी, दाढी, चाकूर, कानफोडी, नांदेड खु., भातकुली, नायगाव, दिघी, महल्ले, गोकुळसरा भाग १ व २ बोरगा निस्ताने (धामणगाव रेल्वे) निंभार्णी, शिवरा भाग १ ते ३ (मोर्शी) नांदेड बु., खानपूर चिपर्डा, जहानपूर दिली, वडुरा, करतखेड, लासूर, रामतीर्थ, चांडोळा (दर्यापूर), हिवरापूर्णा, येलकी पूर्णा, सावळापूर, खानापूर, दोनोडा, खैरी, येसुर्णा, निंभारी, वडगाव खु., सावळी बु. (अचलपूर), तळणी पूर्णा, खाकरखेडा पूर्णा (चांदूर बाजार), सोनाबर्डी, रत्नापूर, मोखा, चिचघाट (चिखलदरा).
४४ पैकी ३३ घाटांकरिता तीनदा निविदा मागविल्या; मात्र याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आता याबाबत काय निर्णय घ्यायचा, यासंदर्भात शासनाकडे पत्रव्यवहार केला आहे. शासनाकडून मार्गदर्शन प्राप्त झाल्यावर पुढील निर्णय घेऊ. - इम्रान शेख, जिल्हा खनिकर्म अधिकारी.