वरूडच्या नायब तहसीलदारांसह चार तलाठ्यांवर रेतीमाफियाचा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2022 11:34 PM2022-11-17T23:34:26+5:302022-11-17T23:36:09+5:30
डंपरचालकांनी पथकाला कागदपत्रे दाखविली नाही. याचवेळी मागून कारने आलेल्या दोघांनी पथकातील पाच जणांवर बेसबॉल स्टिकने हल्ला चढविला, तर एका तलाठ्याचा मोबाइल हिसकावून नेला. तक्रार दाखल झाल्यानंतर शेंदूरजनाघाट पोलिसांनी डंपर जप्त करून आठ वाळू तस्करांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिकाऱ्यांना रेती तस्करांकडून हल्ल्याची तालुक्यातील ही दुसरी घटना आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वरूड : अवैध रेती वाहतुकीवर अंकुश ठेवण्याकरिता महसूल प्रशासनाने पथक नेमले. नायब तहसीलदार आणि चार तलाठ्यांचे हे पथक गुरुवारी पहाटे दाेन वाजता पुसला बसस्टँडवर असताना वरूडकडे दोन रेतीचे डंपर येत होते. डंपरचालकांनी पथकाला कागदपत्रे दाखविली नाही. याचवेळी मागून कारने आलेल्या दोघांनी पथकातील पाच जणांवर बेसबॉल स्टिकने हल्ला चढविला, तर एका तलाठ्याचा मोबाइल हिसकावून नेला. तक्रार दाखल झाल्यानंतर शेंदूरजनाघाट पोलिसांनी डंपर जप्त करून आठ वाळू तस्करांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिकाऱ्यांना रेती तस्करांकडून हल्ल्याची तालुक्यातील ही दुसरी घटना आहे.
पोलिस सूत्रांनुसार, कृणाल राजस, हर्षल ऊर्फ गोलू इंगोले (दोघेही रा. जरूड) यांच्यासह दोन टिप्परमधील चालकांसह अधिक चार लोकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तालुक्यातून अवैध रेतीची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याचे पाहून तहसीलदारांनी नायब तहसीलदार पंकज चव्हाण, तलाठी विनोद पवार, महेंद्र चव्हाण, केवलसिंह गोलवाल, रवींद्र परतेती यांच्या पथकाची १५ नोव्हेंबरला रेती तस्करीला आळा घालण्याकरिता नियुक्ती केली. पथक १७ नोव्हेंबरच्या पहाटे दोनच्या सुमारास वरूड ते पांढुर्णा मार्गावर अवैध रेती वाहतूक तपासणीकरिता पुसला बसस्टँडवर उभे होते. वाळू घेऊन येणारे दोन डंपर त्यांनी थांबविले. तथापि, चालकांनी आवश्यक कागदपत्रे दाखविण्यास नकार दिला. यादरम्यान कारमधून कुणाल राजस आणि हर्षल उर्फ गोलु इंगोले उतरले आणि डम्पर थांबविल्याबाबत पथकाला शिवीगाळ केली. व्हिडीओ शूटिंग करीत असलेले चव्हाण यांचा मोबाइल हिसकावला. यानंतर बेसबॉल स्टिकने सर्वांना मारहाण केली. यानंतर त्यांनी कारसह पोबारा केला.
शेंदूरजनाघाटचे ठाणेदार सतीश इंगळे यांनी पोलिस ताफ्यासह घटनास्थळावर जाऊन दोन डंपर ताब्यात घेतले. नायब तहसीलदार पंकज चव्हाण यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पुढील तपास शेंदूरजनाघाट पोलीस करीत आहेत.
एकाच महिन्यातील दुसरी घटना
रेती तस्करी करणाऱ्या वाहनाला ८ नोव्हेंबरला बेनोडा येथील सहायक पोलिस उपनिरीक्षक यांनी थांबविले असता, धक्काबुक्की केली होती. तेव्हासुद्धा गुन्हे दाखल केले. आता महसुली अधिकाऱ्यांवर हल्ला केला. यापूर्वी तहसीलदारांच्या बंगल्याला बाहेरून कुलूप ठोकण्याचा प्रकार घडल्याने गुन्हे दाखल झाले. मात्र, ठोस कारवाई झाली नाही. यामुळे रेती तस्करांचे चांगलेच फावले आहे.