वाळू माफियांचे धाबे दणाणले
By admin | Published: May 29, 2017 12:12 AM2017-05-29T00:12:52+5:302017-05-29T00:12:52+5:30
जिल्ह्यातील रेती तस्करांविरुद्ध जिल्हा ग्रामीण पोलीस विभाग व महसूल विभागाच्या संयुक्त कारवाईमुळे वाळूतस्करांचे धाबे दणाणले आहे.
पोलिसांचे विशेष पथक गठित : महसूल, पोलीस प्रशासनाची धडक कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूरबाजार : जिल्ह्यातील रेती तस्करांविरुद्ध जिल्हा ग्रामीण पोलीस विभाग व महसूल विभागाच्या संयुक्त कारवाईमुळे वाळूतस्करांचे धाबे दणाणले आहे. यामुळे रेतीची उणीव भासत असून रेतीचे भाव दिवसेंदिवस वाढत चालले आहे.
रेती व्यवसायात अवैध रेती व्यवसाय करणारा मोठा वर्ग निर्माण झाला आहे. स्थानिक पातळीवरील काही अधिकारी, कर्मचाऱ्यांना हाताशी धरून तसेच काही राजकीय पक्षाचा हितसंबंध जोपासून रेती तस्कर आपले हात ओले करून घेत आहे. त्यामुळे बांधकामाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. रेतीलासुद्धा मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मात्र नव्यानेच जिल्ह्यात रुजू झालेले जिल्हाधिकारी अभिजित बांगर व जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांच्यातर्फे या वाळू माफियाची मुसळ्या आवळण्याचे कामसुद्धा जोरात सुरू आहे. या धडक कारवाईमुळे वाळू माफियाला सळो की पळो करू सोडले आहे.
या कारवाईकरिता दोन्ही विभागातर्फे विशेष पथक गठित करण्यात आले आहे. त्यानुसार तालुक्यातील चांदूरबाजार, आसेगाव, ब्राम्हणवाडा थडी, शिरजगाव कसबा पोलीस ठाण्याअंतर्गत जवळ-जवळ २५ -३० वाहनांवर व वाहन मालकांवर कारवाई करण्यात आली आहे.
यावेळी प्रथमच जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांतर्फे रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टर मालकावर फौजदारी कारवाई करण्याचा सपाटा लावला आहे. यामुळे पोलिसी हिसका दिसताच गब्बर झालेला वाळुमाफीया आपला अवैध व्यवसाय सोडून इतर व्यवसायाकडे वळत असल्याची माहिती चर्चेदरम्यान समोर येत आहे. काही वाळू माफियातर्फे राजकीय पाठबळ घेऊन व्यवसाय करणाऱ्यांचेसुद्धा महसूल व पोलीस प्रशासनाच्या कारवाईमुळे धाबे दणाणले आहे. जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांचा निर्देशानुसार विशेष पोलीस पथक हे अवैधरित्या रेती चोरी करून वाहतूक करणाऱ्यांवर "वॉच" ठेवीत असल्याने बांधकाम करणाऱ्यांना रेतीची टंचाई भासणार आहे.
भरधाव जाणाऱ्या ट्रॅक्टरची चाके अचानकपणे थांबलीत
स्थानिक महसूल प्रशासनाने अवैध रेती तस्करी करणाऱ्यावर अंकुश ठेवण्यात मोठ्या प्रमाणात यश मिळविले आहे. मागील ५ महिन्यांत लाखो रुपयांचा महसूल गोळा केला आहे. यावर ग्रामीण पोलीस विभागातर्फे ट्रॅक्टर मालकावर फौजदारी दाखल केली जात असल्याने रस्त्यावर भरधाव वेगाने धावणारे ट्रॅक्टरची चाके अचानकपणे थांबली आहेत.