रात्रीस खेळ चाले.. अवैध उपशाने नदीपात्राची चाळण; पथक कशी करतात राखण?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2023 12:20 PM2023-05-23T12:20:38+5:302023-05-23T12:27:47+5:30

कुणाचाही वचक नसल्याने बिनदिक्कतपणे होत आहे तस्करी; खोल खड्ड्यांमुळे तयार झाले डोह, मजुरांसाठीही धोकादायक

sand smuggling at peak in amravati dist, administrations no control on smugglers | रात्रीस खेळ चाले.. अवैध उपशाने नदीपात्राची चाळण; पथक कशी करतात राखण?

रात्रीस खेळ चाले.. अवैध उपशाने नदीपात्राची चाळण; पथक कशी करतात राखण?

googlenewsNext

अमरावती : अद्याप एकाही रेती घाटाचा लिलाव झाला नाही. रेतीअभावी घरकुलांची कामे थंडबस्त्यात आहेत. दिवसा कुठल्याच प्रकारची हालचाल न करणारे हे रेती तस्कर रात्रीच्या काळोखात रेती तस्करीचा हा खेळ मांडत असतात. कुणाचाही वचक नसल्याने नदीपात्रांची चाळण बिनदिक्कतपणे सुरू आहे. अर्थात याला महसूल आणि पोलिस प्रशासनाची मूक संमती आहेच. जिल्हा प्रशासन अवैध रेती उपशावर कारवाईचा बडगा उगारण्याचा दावा करत असले तरी तो किती खोटा आहे, याचा आढावा लोकमत चमूने घेतला. याच दाव्याची पोलखोल करणारा हा ग्राऊंड रिपोर्ट.

अचलपूर : नदीपात्र पोखरले

अचलपूर तालुक्यात चंद्रभागा बिच्छन सापन व पूर्णानदी पात्रासह काही नाल्यातून रेतीचा उपसा मोठ्या प्रमाणात केला जात असल्याचे वास्तव चित्र आहे.

सोमवारी सकाळी बिच्छन आणि चंद्रभागा नदीपात्रात फेरफटका मारला असता मोठ्या प्रमाणात नदीपात्रात खोदून ठेवलेले खड्डे चाळणीने गाळून ठेवलेल्या रेतीचे ढिगारे आढळून आले. तर ही रेती नेण्यासाठी मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टरच्या चाकोल्या सुद्धा स्पष्टपणे दिसत होत्या. परिसरातील शेतकऱ्यांशी चर्चा केली असता रात्रीतून हा खेळ चालत असल्याचा प्रकार त्यांनी सांगितला. रोजगार मिळतो म्हणून आजूबाजूच्या खेड्यातील मजूर वर्ग रात्रीला रेती खोदून छानाने व चाळणी झालेली रेती ट्रॅक्टरमध्ये भरून देण्याचा करार करतात. त्याचे त्यांना पंधराशे ते दोन हजार रुपये दिले जाते तर ३७०० ते ४००० रुपये प्रतिब्रास ट्रॅक्टरने ही रेती अचलपूर तालुक्यातील ग्रामीण भागात विकली जात असल्याचे पुढे आले आहे.

रात्रीतून ट्रॅक्टरद्वारे मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी होत असल्याने बोरगाव पेठ, बोरगाव दोरी, देवरी व निजामपूर, हरम टवलार खांजबानगर, सावळी वडगाव, फत्तेपूर असा ग्रामीण नदीपात्राला लागून असलेल्या गावातून हा तस्करीचा खेळ चालत असल्याचे वास्तव आहे.

आठ दिवसांपूर्वी आपण रुजू झालो त्या दरम्यान दोन कारवाया केल्या आहेत. सहा पथके आहेत. रात्रीतून सुद्धा विशेष पथक गस्तीवर आहेत. वाळू माफिया व चोरट्यांना आळा घालण्यासाठी नियमानुसार कारवाई केली जात आहे.

- संजयकुमार गरकल तहसीलदार, अचलपूर

चांदूर बाजारात पूर्णा काठावरून सर्वाधिक रेती चोरी

चांदूर बाजार तालुक्यातील हिरुळपूर्णा, कोदोरी, कुरळ पूर्ण फुबगाव, शिरजगाव कसबा, करजगाव सारख्या अनेक रेती घाटावरून वाळू माफिया भरदिवसा रेतीचा उपसा करून रात्री ट्रॅक्टरमधून त्याची वाहतूक करतात. अवैधरित्या रेती उत्खनन व वाहतुकीकरिता विना नंबरच्या वाहनांचा सर्रास वापर केला जातो. तसेच वाहतूक करताना महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या घरावर पाळत ठेवणारी वाळू माफियांची मोठी यंत्रणा आहे.

पोलिस प्रशासनातर्फे या अवैध रेती उपशावर हेतू पुरस्पर कार्यवाही करीत नसल्याने मुजोर बनलेल्या वाळूमाफियाने चक्क तालुक्यातील पोलिसांवरच वाहन चालवण्याचा प्रयत्न केल्याची घटना ताजीच आहे. याप्रकरणी आरोपी फरार झाले.

 एकाही घाटाचा लिलाव नाही तरी तस्करी सुरू !

वरुड तालुक्यात रेतीचे पाच घाट असून तीन घाटांवर नदीमध्ये पाणी असल्याने रेती काढता येत नाही तर दोन घाटाचे लिलाव करण्याचे प्रस्ताव खनिकर्म विभाकडे मंजूर झाले होते;मात्र जीएसडीएने मंजुरी दिली नसल्याने देऊतवाडा आणि घोराड रेती घाटाचा लिलाव झाला नाही;परंतु रेटीतस्करांना मोकळं रान झालं.रात्रीच्या काळोखात रेतीची मोठ्या प्रमाणावर तस्करी करून ती ट्रॅक्टरने नियोजित ठिकाणी पोहोचविली जाते.

तालुक्यात वर्धा नदीवर घोराड,देऊतवाडा,वघाळ,वंडली आणि हातुर्णा हे पाच रेती घाट आहेत. यातील वघाळ,वंडली आणि हातुर्णा येथे बंधाऱ्यामुळे पाणी असल्यानं नदीपात्रातून रेती काढणे शक्य होत नाही. यामुळे हे तीन घाट लिलावात घेतले नव्हते.तर घोराड आणि देऊतवाडा दोन घाट जिल्हाधिकारी आणि खनिजकर्म विभाग यांनी लिलावास काढले; मात्र जीएसडीएने मान्यता दिली नसल्याने ते सुद्धा रखडले. विशेष म्हणजे, रात्रीतून रेती तस्करी होत असल्याने माहिती मिळत नाही.तसेच झिरो रॉयल्टी ६०० रुपये ब्रास विक्रीबाबत एकही घाट नाही असे प्रभारी तहसीलदार पंकज चव्हाण सांगतात.

तापी नदीवर मध्य प्रदेशाची वक्रदृष्टी

धारणी तालुक्यातील प्रमुख नद्यांना सध्या तस्करांनी आपले केंद्र बनविले असून कुठे दिवसाढवळ्या तर कुठे रात्री बेरात्री मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळू चोरीच्या प्रकारामुळे नदी, नाले चाळणी झाले आहेत.

मेळघाटात महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशाला सीमारेषा म्हणून ओळख असलेली तापी नदी यासह गडगा, सिपना, डवाल आणि खंडू या प्रमुख नद्या आहेत. यासोबत अनेक लहान मोठे नाले सुद्धा तालुक्यात असून या पात्रात मोठ्या प्रमाणात पावसाळ्यात रेती गोळा होते.

याबाबत प्रस्तुत प्रतिनिधीने रविवारी नद्यांची प्रत्यक्ष पाहणी केली असता अनेक ठिकाणी नदीपात्रातून रेती उत्खनन होताना दिसून आले. प्रस्तुत प्रतिनिधीला नारवाटी ते कळमखार दरम्यान गडगा नदीपात्रात उतरताना बघताच रेती उपसा करणाऱ्यांनी आपले पावडे, घमेले व चाळणी जागेवर सोडून पळ काढला.

याबाबत तहसीलदार प्रदीप शेवाळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी रेती तस्करांवर वेळोवेळी कारवाई करण्यात येत असल्याचे सांगितले.

प्रशासन सुस्त, वाळूघाट फस्त.

तिवसा तालुक्यात भरमसाठ साठा उपलब्ध असलेल्या वाळू घाटात भविष्यात वाळूचा कणही शिल्लक राहू नये,अशाप्रकारे वाळूघाट ओरबडले जात आहेत.या अवैध उत्खननातून दैनंदिन शेकडो ब्रास वाळूची विल्हेवाट लावली जात आहे. सर्वसामान्यांच्या सहज निदर्शनास पडणारा हा गंभीर प्रकार महसूल व पोलिस प्रशासनाला दिसू नये याबाबत कमालीचे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.तालुक्यातील एकूण आठ घाटांपैकी जावरा, फत्तेपूर,भारवाडी,चांदुर ढोरे,धामंत्री,नमस्कारी,उंबरखेड या घाटातून राजरोसपणे वाळू उपसा सुरू आहे.त्यासाठी नदीपात्रात दहा पंधरा फुटांपर्यंत उत्खनन करण्यात आल्याने पर्यावरणाची पुरती वाट लावण्यात येत आहे.

अवैध वाळू वाहतुकीला निर्बंध लावण्यासाठी आटोकाट प्रयत्न करण्यात येत आहेत; परंतु एकाचवेळी सर्वत्र गस्त घालणे शक्य होत नाही. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेच्या नजरेआड हे प्रकार चालत असेल तर त्यासाठी ॲक्शन प्लॅन तयार करण्यात येईल.

- आशिष नागरे, नायब तहसीलदार महसूल विभाग, तिवसा.

Web Title: sand smuggling at peak in amravati dist, administrations no control on smugglers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.