कोविड निगेटिव्ह अहवालावर रेतीची तस्करी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:09 AM2021-04-29T04:09:58+5:302021-04-29T04:09:58+5:30
भोकरबर्डी तपासणी नाक्यावर मनुष्यबळ नाही, मध्यप्रदेशातील गौण खनिज धारणी तालुक्यात पंकज लायदे-धारणी : महाराष्ट्र शासनाच्या नवीन नियमावलीनुसार परप्रांतातून कोणत्याही ...
भोकरबर्डी तपासणी नाक्यावर मनुष्यबळ नाही, मध्यप्रदेशातील गौण खनिज धारणी तालुक्यात
पंकज लायदे-धारणी : महाराष्ट्र शासनाच्या नवीन नियमावलीनुसार परप्रांतातून कोणत्याही गौण खनिजाची ने-आण करण्यासाठी महाखनिज पोर्टलवर संबंधित वाहनाची नोंदणी करणे आवश्यक असताना, कोविड निगेटिव्ह अहवालावर मध्य प्रदेशातील रेती विनापरवानगी धारणी शहरात व संपूर्ण तालुक्यात येत आहे. आंतरराज्य सीमेवरील भोकरबर्डी तपासणी नाक्यावर महसूल विभागाचे पथकाची नियमित उपस्थिती नसल्याने दिवसाढवळ्या ही रेतीची तस्करी केली जात आहे.
धारणीतील एकाही रेतीघाटाचा पाच वर्षापासून लिलाव झाला नसताना, कोणत्याही घाटातून ही रेती उपसली जाते आणि तालुक्यात व शहरात याच रेतीचा दामदुपटीने पुरवठा केला जात आहे. तालुक्यात अडीच हजारांपेक्षा जास्त घरकुल बांधकामाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना रेती मिळत नाही. त्यामुळे संसार उघड्यावरच आहेत. असे असताना इतर खासगी बांधकामांना मात्र उधाण आले आहे. तहसीलदार, उपविभागीय अधिकारी़ व त्यांचे अधिनस्थ तलाठी यांचे गौण खनिज प्रतिबंधात्मक पथकाच्या भूमिकेकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. रेती तस्करीमुळे राज्याच्या महसूल विभागाला लाखोंचा चुना लागत असून जिल्हाधिकारी अमरावती यांनी या प्रकाराकडे लक्ष देऊन रेती तस्करांच्या मुसक्या आवळाव्या, अशी मागणी मेळघाटात होत आहे.
बॉक्स
महाखनिज पोर्टलवर नोंदणी केल्यास १० टक्के रॉयल्टीचा लाभ
मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात रेतीची अथवा कोणत्याही गौण खनिजाची वाहतूक करायची असेल, तर शासनाच्या महाखनिज पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. त्याने महाराष्ट्र सरकारला दहा टक्के रॉयल्टीचा लाभ मिळतो. परंतु, मेळघाटात जिल्हाधिकाऱ्यांनी मोजक्याच कंत्राटदारांना रेती वाहतुकीची परवानगी दिली आहे. त्याच्या आधारे सर्रास अवैध रेती वाहतूक सुरू आहे. त्याचा कुठलाही लाभ महाराष्ट्र सरकारला मिळत नाही. शासन परिपत्रकाकडे रेती चोरटे व महसुल च्या अधिकाऱ्यांनी पाठ फिरविली आहे.
अल्पवयीन चालकांचा वापर
धारणी तालुक्यात रेती तस्करीकरिता ट्रॅक्टरवर गावातीलच अल्पवयीन चालकाचा वापर करणे सुरू केले आहे. भोकरबर्डी वनविभागाच्या नाक्यावर एका चालकाचा कोविड अहवाल तपासताना त्याचे वय १७ वर्षे आढळले. यामुळे चालकांच्या लायसन्सची तपासणी करणेसुद्धा गरजेचे ठरले आहे.
बाईट
शासनाच्या नव्याने सुरू झालेल्या महाखनिज पोर्टलवर नोंदणी करून रेती वाहतूक करणे गरजेचे आहे. त्याचा मेसेज वाहतूकदाराच्या मोबाईलवर असणे गरजेचे आहे. तपासणीअंती तसे आढळून न आल्यास ती वाहतूक अवैध समजली जाईल. संबंधितावर कारवाई करण्यात येईल.
- अतुल पाटोळे, तहसीलदार, धारणी