घुईखेड शिवारात रेतीसाठा पकडला
By admin | Published: January 15, 2015 10:43 PM2015-01-15T22:43:42+5:302015-01-15T22:43:42+5:30
तालुक्यातील घुईखेड शिवारात रेती तस्करांनी धुमाकूळ घातला असून रेती माफियांनी रेतीची चोरी करून घुईखेड व पिंपळखुटा गावाच्या सीमेवरील बेंबळा बुडीत क्षेत्रात अवैध रेतीचे ढीग केले होते.
चांदूररेल्वे : तालुक्यातील घुईखेड शिवारात रेती तस्करांनी धुमाकूळ घातला असून रेती माफियांनी रेतीची चोरी करून घुईखेड व पिंपळखुटा गावाच्या सीमेवरील बेंबळा बुडीत क्षेत्रात अवैध रेतीचे ढीग केले होते. याची तक्रार घुईखेड येथील गावकऱ्यांनी दिल्यानंतरही तहसीलदार यांनी टाळाटाळ केली होती. त्यामुळे तक्रारकर्त्यांनी यवतमाळ उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. याची दखल घेऊन एसडीओ टापरे यांनी धडक कारवाई करीत ७० ब्रास रेती जप्त केली. घुईखेड शिवारातून मंडळ अधिकाऱ्यांनी १० ब्रास असे एकूण ८० ब्रास रेती जप्त करण्यात आली.
घुईखेड गाव यवतमाळ व अमरावती जिल्ह्याच्या सीमेवर असून येथील शेकडो एकर शेती बेंबळा धरण प्रकल्पात गेली आहे. त्याचा फायदा येथील रेती तस्कर घेत आहेत. चांदूररेल्वे व बाभुळगाव तालुका महसूल प्रशासनाच्या डोळ्यात धूळ फेकत रेती तस्करांनी पिंपळखुटा परिसरातील नाल्यातून व घुईखेड शिवारातील नदी व नाल्यातील रेतीचा उपसा सुरू केला आाहे. चोरलेली रेती दडपण्यासाठी बेंबळा धरण क्षेत्रातील शेतात ढीग लावले आहे.
घुईखेड येथील गजानन गिरी, शेख ताजमहमद भाई, शंकर भोयर यांनी बाभुळगाव व तहसीलदारांकडे तक्रारी केल्यात. मात्र बाभुळगाव तहसीलदाराने दखल न घेतल्यामुळे थेट यवतमाळचे उपविभागीय अधिकारी टापरे यांच्याकडे तक्रार केली. त्याची टापरे यांनी दखल घेऊन मंगळवारी तहसीलदार सावंत, मंडल अधिकारी कांबळे, तलाठी नारनवरे यांनी घुईखेड बुडीत क्षेत्रात व पिंपळखुटा शिवाराची पाहणी केली. त्यामध्ये गट क्र. ३६ मध्ये शंकर महादेव जाधव यांच्या शेतात ५० ब्रास रेतीचे ढीग व गट नं. २२ मध्ये बेनाम २० ब्रास रेतीचे ढीग आढळून आले.
यवतमाळ महसूल विभागाने सर्व रेतीचे ढीग जप्त करून पंचनामा केला. घुईखेडचे मंडळ अधिकारी धोटे व तलाठी सावरकर यांनी घुईखेड हद्दीतील १० ब्रास रेती जप्तीची कारवाई केली. यामुळे रेती तस्करांचे धाबे दणाणले आहे. (तालुका प्रतिनिधी)