भातकुली तालुक्यात वाळू वाहतूक बिनबोभाट!
By admin | Published: December 27, 2015 12:37 AM2015-12-27T00:37:55+5:302015-12-27T00:37:55+5:30
तहसीलदाराच्या अंगावर वाहन घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्यानंतरही वाळू चोरट्यांचा हैदोस सुरू आहे.
वाहतुकीसोबत चोरीही : महसूल विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष
अमरावती : तहसीलदाराच्या अंगावर वाहन घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्यानंतरही वाळू चोरट्यांचा हैदोस सुरू आहे. भातकुली तालुक्यातून वाहणाऱ्या पेढी नदीच्या पात्रातून वाळूचे उत्खनन सुरू असताना तस्करांचे चांगलेच फावले आहे. भातकुली तालुक्यातील एकाही वाळूघाटाचा अद्यापपर्यंत लिलाव झालेला नाही. त्यामुळेच जिल्ह्यात सर्वदूर व शहराच्या कानाकोपऱ्यात पेढी नदी व नाल्यांमधील अवैधरीत्या वाळू पोहचत असल्याचे चित्र आहे.
हरतोटी येथे भातकुलीचे तहसीलदार अजित येळे यांच्या अंगावर वाहन घालण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र त्यानंतरही वाळू चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात तहसील प्रशासनाला यश आले नाही. ६ महिन्यांपूर्वी येथील तहसीलदार सुरेश बगळे यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्यानंतर महसूल प्रशासन खडबडून जागे झाले. त्यानंतर बगळे यांनी कारवाईचा धडाका लावून अमरावती तालुक्यांतर्गत येणाऱ्या परिसरासह शहरातूनही वाळूसाठा जप्त केला होता. मात्र येळे यांच्या प्रकरणानंतर महसूल प्रशासन शांतच आहे. भातकुली तालुक्यातील कुंड खुर्द, हातुर्णा, सातुर्णा, गोपगव्हाण, अळणगाव, हरताळा, वासेवाडी, निंभा, परलाम या भागातून दिवसागणिक वाळूची चोरटी वाहतूक होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.