संजय खोडके पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 09:45 PM2018-08-28T21:45:45+5:302018-08-28T21:46:08+5:30
काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय खोडके यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. साडेचार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर खोडकेंची राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार यांच्या उपस्थितीत ‘घरवापसी’ झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय खोडके यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. साडेचार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर खोडकेंची राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार यांच्या उपस्थितीत ‘घरवापसी’ झाली आहे.
जिल्ह्याच्या राजकारणात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणारे, अशी ओळख संजय खोडके यांची आहे. मुळात राष्ट्रवादीतून राजकारणात उडी घेणारे खोडकेंना काही कारणास्तव राष्ट्रवादीतून काँग्रेसमध्ये प्रवेश करावा लागला होता. काँग्रेसचे प्रदेश सचिवपदी त्यांनी चार वर्षे धुरा सांभाळली. मात्र, काँग्रेसमध्ये संजय खोडकेंचे मन रमले नाही, हे त्यांच्या ‘राष्ट्रवादी’ प्रवेशाहून स्पष्ट झाले. संजय खोडकेंशिवाय जिल्ह्यात राष्ट्रवादीचे राजकीय ‘वजन’ नाही, ही बाब राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हेरली. दरम्यान, खोडकेंशी जयंत पाटलांनी संवाद साधला. मध्यंतरी खासदार सुप्रिया सुळे यांनीसुद्धा संजय खोडके यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली होती. त्याचवेळी खोडके हे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचे संकेत मानले जात होते. संजय खोडकेंना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सन्मानाने परत आणण्याची यशस्वी शिष्टाई जयंत पाटील व छगन भुजबळ यांनी पार पाडली आहे. मुंबई येथे सोमवारी झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात शरद पवार यांच्या उपस्थितीत खोडकेंसह अन्य समर्थकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात आता खोडके सक्रिय होणार असून, काँग्रेससाठी हे ‘शेडबॅक’ मानले जात आहे.
काँग्रेसमधून बाहेर जाण्याची इच्छा नव्हती. मात्र, जिल्ह्यात काँग्रेसमध्ये अंतर्गत वादात घुसमट होती. प्रदेशस्तरावर सन्मान मिळाला; पण जिल्ह्यात काँग्रेसमध्ये मला दूर ठेवण्याची राजकीय खेळी चालविली गेली.
- संजय खोडके,
राष्ट्रवादीचे नवनियुक्त नेते