रिमझिम पावसाने पिकांना संजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2018 09:54 PM2018-07-07T21:54:23+5:302018-07-07T21:55:32+5:30

गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात हलका व मध्यम स्वरूपाचा होत असलेला पाऊस पिकांना पोषक आहे. काही तालुक्यात उशिराने पेरणी झाल्या. या पेरणीचा मेळदेखील साधला गेल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.

Sanjivani for the crops with drizzle drizzle | रिमझिम पावसाने पिकांना संजीवनी

रिमझिम पावसाने पिकांना संजीवनी

Next
ठळक मुद्देरविवारपासून सार्वत्रिक : महाबीजच्या सोयाबीन बियाण्यांचा मात्र दगा, दुबार पेरणीचे सावट

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात हलका व मध्यम स्वरूपाचा होत असलेला पाऊस पिकांना पोषक आहे. काही तालुक्यात उशिराने पेरणी झाल्या. या पेरणीचा मेळदेखील साधला गेल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. मात्र, काही भागात महाबीजच्या सोयाबीन बियाण्याची उगवण कमी झाल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागत आहे.
यंदाच्या खरिपामध्ये जिल्ह्यात ७.२८ लाख हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. यापैकी सहा लाख हेक्टरमध्ये सद्यस्थितीत पेरणी झाली. यंदा रोहिणी व मृग नक्षत्र कोरडे गेल्यामुळे शेतकºयांची मदार आर्द्रावर होती. या नक्षत्राचा पहिला आठवडा कोरडाच गेल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या होत्या. नंतर मात्र समाधानकारक पाऊस झाल्याने दोन आठवड्यापासून जिल्ह्यात पेरण्यांचा वेग वाढला. सद्यस्थितीत जिल्ह्यात ८० टक्क्यांवर क्षेत्रात खरिपाची पेरणी झालेली आहे.
जिल्ह्यात १ जून ते ७ जुलै या कालावधीत २०८ मिमी पावसाची सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात २२६.३ मिमी पाऊस पडला. सद्यस्थितीत जिल्ह्यात पावसाने सरासरी पार केलेली आहे. हा पाऊस ११७ टक्के आहे. मागील वर्षी याच तारखेला फक्त १०८ मिमी पाऊस पडला होता.
वार्षिक सरासरीच्या तुलनेत सध्या २८ टक्के पाऊस पडला आहे. यामध्ये सर्वाधिक २६० मिमी पाऊस चांदूर रेल्वे तालुक्यात झाला असून, सर्वात कमी १७२ मिमी पाऊस धारणी तालुक्यात कोसळला आहे.
नांदगाव खंडेश्वरला सर्वाधिक पाऊस
जिल्ह्यात सद्यस्थितीत २२६ मिमी पाऊस पडला. यामध्ये सर्वाधिक २८८ मिमी पाऊस नांदगाव खंडेश्वर तालुक्यात पडला. अमरावती २१६ मिमी, बुलडाणा १८२ मिमी, चांदूर रेल्वे २६० मिमी, धामणगाव रेल्वे २३१ मिमी, तिवसा १९५ मिमी, मोर्शी २२३ मिमी, वरूड २४६ मिमी, अचलपूर २६९ मिमी, चांदूर बाजार २०७ मिमी, दर्यापूर २३६ मिमी, अंजनगाव सुर्जी २०९ मिमी, धारणी १७२ मिमी व चिखलदरा तालुक्यात २३१ मिमी पाऊस पडला.
काही भागात सोयाबीनची दुबार पेरणी
गतवर्षी बोंडअळीच्या नुकसानामुळे यंदा शेतकऱ्यांचा कल सोयाबीनकडे अधिक आहे. मात्र, अचलपूर, भातकुलीसह काही तालुक्यांमध्ये महाबीजच्या सोयाबीन बियाण्याची उगवण कमी झाल्याने शेतकºयांवर दुबार पेरणीची वेळ आली. याबाबत शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी केल्या आहेत. पावसाला उशिरा सुरवात झाल्यामुळे ६० दिवसांच्या कालावधीतील मूग, उडिदाचे बहुतांश क्षेत्र बाद होऊन सोयाबीनमध्ये रूपांतरित झाल्याने यंदा सोयाबीनची क्षेत्रवाढ होणार आहे.
हवामानाची सद्यस्थिती
वायव्य बंगालचा उपसागर आणि लगतच्या ओरिसा किनारपट्टीवर असलेल्या चक्राकार वाऱ्याच्या प्रभावामुळे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले. संबंधित चक्राकार वारे ७.५ किमी उंचीवर तयार होऊन ते दक्षिणेकडे झुकल्याने दक्षिण व लगतच्या मध्य भारतात बहुतेक ठिकाणी मध्यम ते भारी पाऊस पडत आहेत. पश्चिम किनारपट्टीवर असलेली टर्फ रेषा मजबूत होण्याची शक्यता आहे. मान्सून सक्रिय होण्याची स्थिती पाहता, तीन दिवस मध्य भारतात पाऊस कायम राहणार असल्याचे हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी सांगितले.

Web Title: Sanjivani for the crops with drizzle drizzle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.