ज्येष्ठांचा पीएचडीचा मार्ग सुकर; ६० वर्षांवरील विद्यार्थ्यांना पेट परीक्षेतून सूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2022 11:35 AM2022-06-06T11:35:52+5:302022-06-06T11:40:29+5:30
कुलगुरु डॉ. दिलीप मालखेडे यांच्या दालनात या संदर्भात बैठक घेण्यात आली.
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावतीविद्यापीठाने ६० वर्षांवरील विद्यार्थ्यांना पेट परीक्षेतून सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आचार्य पदवी (पीएच.डी.) करण्याचा मार्ग सुकर झाला आहे. व्यवस्थापन परिषदेने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याने अनेकांना दिलासा मिळणार आहे.
कुलगुरु डॉ. दिलीप मालखेडे यांच्या दालनात या संदर्भात बैठक घेण्यात आली. यावेळी अमरावती विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंंबेडकर स्टडीज सेंटरचे गतवर्षी २९ विद्यार्थी पेट परीक्षा उत्तीर्ण झाले आहे. मात्र, यातील काही विद्यार्थी ६० वर्षांवरील आहेत, ते सेवानिवृत्त झाले; मात्र त्यांनादेखील या विषयात आचार्य पदवी प्राप्त करण्याकरिता संशोधन करायचे आहे, अशा विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. यापूर्वी सिनेट व व्यवस्थापन परिषदेत मंजूर प्रस्तावाचे दाखले देण्यात आले.
त्यामुळे आता अमरावती विद्यापीठात डॉ. आंबेडकर स्टडीजच्या विद्यार्थ्यांना करता येईल पीएच.डी, तर ६० वर्षांवरील विद्यार्थ्याला पेट परीक्षेतून सूट मिळणार आहे. अमरावती विद्यापीठ शिक्षण मंच विभागीय सदस्य व सिनेट तथा व्यवस्थापन परिषद सदस्यांनी हा प्रश्न सिनेट तथा व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत तीव्रतेने मांडून सोडविला आहे. कुलगुरु डॉ. दिलीप मालखेडे, प्र-कुलगुरु डॉ. विजयकुमार चौबे, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉ. हेमंत देशमुख, आदींचे विद्यार्थ्यांनी आभार मानले आहेत.
विद्यापीठात संशोधन केंद्र नसल्याने डॉ. बाबासाहेब आंंबेडकर स्टडीज सेंटरचे उत्तीर्ण विद्यार्थी पीएच.डी. करू शकत नव्हते. एवढेच नव्हे तर अनेकांनी ६० वर्ष ओलांडले आहे. हा विषय सिनेट तथा व्यवस्थापन परिषदेत मार्गी लावला. कुलगुरुंनी यात महत्त्वाची भूमिका बजावली. येत्या शैक्षणिक सत्रात ६० वर्षांवरील विद्यार्थ्यांना पेट परीक्षेतून सूट मिळेल.
- डॉ. प्रफुल्ल गवई, सदस्य, सिनेट, व्यवस्थापन परिषद