संत गाडगेबाबा : श्रमसाधनेच्या मूल्यसंस्कारांचा आदर्श वस्तुपाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2021 02:54 PM2021-12-20T14:54:58+5:302021-12-20T15:24:56+5:30

संत गाडगेबाबा यांनी आपल्या हयातीत चमत्काराला स्थान दिले नाही. एवढेच नव्हे तर ज्या संस्था त्यांनी उभ्या केल्या, त्यांच्या कडेला एक झोपडी करून ते गरज पडेल तेव्हा वास्तव्यास राहत असत.

sant gadge maharaj 65th death anniversary | संत गाडगेबाबा : श्रमसाधनेच्या मूल्यसंस्कारांचा आदर्श वस्तुपाठ

संत गाडगेबाबा : श्रमसाधनेच्या मूल्यसंस्कारांचा आदर्श वस्तुपाठ

googlenewsNext

अमरावती : समाजसुखासाठी अविरत श्रमसाधना हेच गाडगे बाबांचे अभंग होते. बाबांनी श्रम आणि सेवा, श्रम आणि संस्कार, श्रम आणि पूजा, श्रम आणि अभिषेक, श्रम आणि अभंग यांची घातलेली सांगड म्हणजे समाजसुखातून ईश्वरशक्तीचा समाजोद्धार हाच बाबांच्या श्रमसंस्कृतीचा मूलमंत्र होता. बाबांसारख्या एका निरक्षर माणसाच्या मनात स्वयंप्रेरणेतून समाजोद्धाराची एवढी समर्पित भावना निर्माण होते, यातच बाबांच्या मोठेपणाचे सार सामावलेले आहे. बाबांचे सारे जीवनच श्रमसाधनेच्या मूल्यसंस्कारांचा एक आदर्श वस्तुपाठच आहे. 

खरेखुरे देवदूत

बाबांनी देवापुढे हात जोडून प्रार्थना करीत बसण्यापेक्षा हातात खराटा घेऊन सर्वत्र स्वच्छतेचा सुगंध पसरविला. देवाला अभिषेक घालण्यापेक्षा महारोग्याला आंघोळ घालून अंगभर वस्त्रे दिली. देवापुढे मिष्टान्नाचा नैवेद्य ठेवण्यापेक्षा हजारो  गरिबांना जेवण दिले. देवाला भरजरी कपड्याने नटविण्यापेक्षा ऋणमोचनला हजारो गरिबांना घोंगडी व बायकांना लुगडी दिली. देवाची सुंदर मंदिरे बांधण्यापेक्षा ठिकठिकाणी रोगी व वारकरी लोकांच्या सेवेसाठी कोट्यवधीच्या धर्मशाळा बांधल्या. गोरगरीबांची सेवा हीच खरी देवाची पूजा बाबा मानत होते. त्यांना लक्ष्मी आणि सरस्वतीचे वरदान लाभले नाही, मात्र गरिबांच्या दु:खासाठी तळमळणारे मन व त्यांच्या सेवेसाठी राबणारे हात मात्र लाभले. गरिबांचे दु:ख दूर करीत फिरणारे गाडगेबाबा हेच खरे देवदूत होते.

नाशिक धर्मशाळेत विश्वस्तांशी चर्चा करताना संत गाडगेबाबा
नाशिक धर्मशाळेत विश्वस्तांशी चर्चा करताना संत गाडगेबाबा

अबोल लोकसेवक

कर्मवीर भाऊराव पाटील यांनी कराडला १९५४ मध्ये सद्गुरू गाडगे महाराजा महाविद्यालय सुरू केले. एकदा स्वत: बाबा आपल्या नावाचे कॉलेज पाहायला गेले. गावापासून दूर छोट्याशा इमारतीचे हे कॉलेज होते. आवारात गवत वाढले होते. बाबांनी हे पाहिले व आपल्या खात्यातील माणसासह गवत काढून आवार स्वच्छ करण्यास सुरुवात केली. ते कॉलेजच्या शिपायाने पाहिले. कोणीतरी भलतीच माणसे गवत काढताना पाहून त्याने बाबांच्या कामास मनाई केली. बाबांना कॉलेजच्या प्राचार्यांपुढे उभे केले. बाबांना पाहून प्राचार्य उभेच राहिले. त्यांच्याकडे पाहून बाबा म्हणाले - ‘काय जी बाप्पा! माझं नाव कॉलेजला देता अन् अंगण असं कसं घाणेरडं ठेवतात!’ असे म्हणून बाबा संगमाकडे निघून गेले.

नाशिक धर्मशाळेत बाबांचा सत्कार करण्यात आला तो क्षण
नाशिक धर्मशाळेत बाबांचा सत्कार करण्यात आला तो क्षण

बाबांनी भ्रमंतीमध्ये उभारलेल्या संस्था

गाडगेबाबांनी संसाराचा मोह सोडल्यानंतर सन १९१७ पासून समाज प्रबोधनासोबतच विविध सार्वजनिक संस्था उभारण्यास प्रारंभ केला. त्यांनी आपल्या हयातीत राज्यभरात १९ धर्मशाळा, नाशिक येथे कुष्ठधाम व नाशिक, मूर्तिजापूर येथे अंध-पंगू सदावर्त, मूर्तिजापूर व नागरवाडी येथे गोशाळा, चार शाळा व वसतिगृहे याशिवाय पूर्णा नदीवर दोनद (जि. अकोला) येथे दोन व ऋणमोचन येथे तीन घाट, संभू सावरगाव (जि. औरंगाबाद) येथे तलाव व मूर्तिजापूर, उमरी (जि. यवतमाळ व अचलापूर (जि. अमरावती) येथे पाणेरी उभारली. या संस्थांची जबाबदारी त्यांनी श्री गाडगे महाराज मिशन, मुंबई या कार्यालयाकडे दिली आहे. विशेष म्हणजे, या संस्थांमध्ये गाडगेबाबांच्या कुटुंबातील एकही सदस्य नाही.

हातावर मावेल तेवढी भाजी-भाकरी

हजारो लोकांना गोडधोड भोजन घालून त्यांच्या उष्ट्या पत्रवळ्या उचलणारे बाबा दूर कुठेतरी झाडाखाली बसून हातावर मावेल तेवढी भाजी-भाकरी खात असत. अखंड पन्नास वर्षे भाजी-भाकरी खाऊन दु:खी जनतेसाठी काबाडकष्ट करणारे गाडगेबाबा खरेखुरे कर्मयोगी होते. निरक्षरांच्या शिक्षणासाठी अखंड धडपडणारे ज्ञानयोगी होते. बाबांनी सर्वांच्या सुखासाठी सुंदर धर्मशाळा बांधल्या, तोंडी घास भरविला. स्वत: सर्व प्रकारच्या हाल अपेष्टा सोसून सर्वांच्या आनंदासाठी धडपडणारे बाबा कमळाच्या फुलांसारखे जगले. 

मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ते आनंद हरी गढे यांच्यावतीने झुणका भाकर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बाबांनी हातात झाडू तेथील परिसर स्वच्छ केला तो क्षण
मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ते आनंद हरी गढे यांच्यावतीने झुणका भाकर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बाबांनी हातात झाडू तेथील परिसर स्वच्छ केला तो क्षण

विरोध भक्तिभावाला नाही

देवाच्या अस्तित्वाला गाडगेबाबा नकार देत नाहीत. चराचरात रममाण झालेल्या देवाला बंदिस्त करण्याच्या वृत्तीला त्यांनी विरोध केला. पशुबळी, नवस-सायास, पूजाअर्चा, अंधश्रद्धेला तसेच अंगात येणाऱ्या देवादिकांना त्यांचा विरोध होता. शेती नको, काम नको, काहीच नको. त्या देवापुढं उदाधूपाचा एक डोंगर धुपटला की आपोआप शेती पिकून तयार! जमेल का हे असं केलं तर!!’ - असा रोकडा सवाल ते कीर्तनात करीत असत.

आचार्य अत्रे यांचे बोल

जनतेची भाषा बोलणारा असा प्रभावी वक्ता महाराष्ट्रात दुसरा नाही. सर्व रसांची तुडुंब मेजवानी त्यांच्या भाषांत भरलेली आहे आणि त्यांच्या रसवंतीच्या पायात तर विनोदाची मधुर आणि मंजूळ पाहावे किर्तनात

- आचार्य अत्रे ('संत गाडगेबाबा भ्रमणगाथा' मधून साभार)

Web Title: sant gadge maharaj 65th death anniversary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.