संत गजानन स्पर्शाने पुनित औदुंबर पाडण्याचा प्रयत्न!

By admin | Published: July 1, 2014 01:14 AM2014-07-01T01:14:47+5:302014-07-01T01:14:47+5:30

स्थानिक ऐतिहासिक खापर्डे वाड्यातील संत गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने पावन ‘त्या’ स्थळावरील ऐतिहासिक व पवित्र औदुंबराचा वृक्ष तोडण्याचा अज्ञात व्यक्तीने प्रयत्न केल्याची घटना शनिवारी

Sant Gajanan trying to rebuild Pragya! | संत गजानन स्पर्शाने पुनित औदुंबर पाडण्याचा प्रयत्न!

संत गजानन स्पर्शाने पुनित औदुंबर पाडण्याचा प्रयत्न!

Next

संत गजाननांच्या भक्तांचा संताप : खापर्डे वाड्यातील ‘त्या’ स्थळाला धार्मिक संदर्भ
अमरावती : स्थानिक ऐतिहासिक खापर्डे वाड्यातील संत गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने पावन ‘त्या’ स्थळावरील ऐतिहासिक व पवित्र औदुंबराचा वृक्ष तोडण्याचा अज्ञात व्यक्तीने प्रयत्न केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. त्यामुळे श्री संत गजानन महाराज भक्तांच्या भावना तीव्र झाल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून या ऐतिहासिक स्थळाला संरक्षण देण्याची मागणी होेत आहे, हे विशेष.
संत गजानन महाराज प्रकटदिनानिमित्त स्थानिक खापर्डे वाड्याचा इतिहास व या वाड्यातील औदुंबराच्या झाडाखाली संत गजानन महाराजांनी काही काळ घेतलेली विश्रांती असा संदर्भ ‘लोकमत’ने प्रकाशित केला होता. दासगणू महाराजांच्या पोथीत व दादासाहेब खापर्डे यांच्या चारित्र्यात या गोष्टींचा उल्लेख आहे. हे झाड पूर्णपणे वाळले होते. परंतु प्रकटदिनानंतर या झाडाला पालवी फुटली आणि झाडाचे पुनरूज्जीवन झाले.
गजानन भक्तांचा संताप
या स्थळाकडे भक्तांचा ओढा वाढू लागला. भक्तांनी स्वयंस्फूर्तीने ही जागा स्वच्छ केली. या ठिकाणी संत गजानन महाराजांची प्रतिमा ठेवण्यात आली. दर गुरूवारी येथे आरती व प्रसाद वितरणही होऊ लागले. गुढीपाडव्याला या ठिकाणी गुढी उभारण्यात आली.
बाहेरगावच्या भक्तांनी या पवित्र स्थळाला भेटी दिल्या. परंतु काही विघ्नसंतोषी लोकांनी या कार्यात अडथळे आणण्याचा प्रयत्न चालविला आहे. दोन महिन्यांपूर्वी या स्थळावरील हार-फुले विहिरीत टाकली गेली. शनिवारी हे औदुंबराचे पवित्र झाड वैद्यकीय व्यावसायी बबन तोटे यांच्या दवाखान्याच्या इमारतीवर झुकविण्यात आले आहे. या पवित्र औदुंबराची ही विटंबना असल्याच्या तीव्र भावना भक्तांनी व्यक्त केल्या आहेत.
संत गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे स्थळ म्हणजे अमरावती शहराचा महत्त्वाचा ऐतिहासिक ठेवा आहे. त्यामुळे या ऐतिहासिक व धार्मिक संदर्भ असलेल्या स्थळाचे जतन व्हावे, अशी मागणी भक्तांकडून केली जात आहे.
जाज्वल्य इतिहासाची अवहेलना
खापर्डे वाड्याला मोठा इतिहास आहे. अनेक देभक्तांनी या वाड्यातून स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळी केल्या. शिवाय विदर्भाचा मानबिंदू असलेल्या संत गजानन महाराजांनीही या वाड्याला भेट दिली. त्यामुळे या पवित्र स्थळाची अवहेलना म्हणजे इतिहासाचीच अवहेलना आहे, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. भक्तांच्या भावना दुखावल्यामुळे या घटनेला वेगळेच वळण लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. संत गजानन महाराजांवर तमाम भाविकांची नि:सिम श्रद्धा आहे. त्यामुळे असंख्य भाविकांनी या पावन स्थळी मंदिर निर्माण व्हावे, अशी आशा व्यक्त केली आहे.
ही तर पराकोटीची आध्यात्मिक घटना
विदेही अवस्थेत भ्रमण करीत असताना शेगावचे अवलिया संत गजानन महाराजांनी खापर्डे वाड्याला भेट दिली होती. ही पराकोटीची आध्यात्मिक घटना आहे. शिवाय श्रीसंत गजानन महाराजांना दादासाहेब खापर्डे यांनी प्रथम महाराज असे संबोधले होते.

Web Title: Sant Gajanan trying to rebuild Pragya!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.