वरुड येथील संत्राबागा सलाईनवर

By admin | Published: April 12, 2016 12:20 AM2016-04-12T00:20:39+5:302016-04-12T00:20:39+5:30

तालुक्यात अत्यल्प पर्जन्यमानामुळे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

On the Santragga Salinwar in Varud | वरुड येथील संत्राबागा सलाईनवर

वरुड येथील संत्राबागा सलाईनवर

Next

भूजल पातळी खालावली : २१ हजार हेक्टरमधील बागांना धोका
वरूड : तालुक्यात अत्यल्प पर्जन्यमानामुळे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तालुक्यात ९ प्रकल्प असून यावर्षी पावसाळयात १०० टक्के जलसाठा संचयित झाला होता. परंतु आता या प्रकल्पात केवळ १२ ते १५ टक्के जलसाठा आहे. सिंचन विहिरीतील भूजल पातळीसुध्दा खालावल्याने दिवसभर चालणारे पंप केवळ अर्ध्या तासावर आले आहेत. भूजल पातळी ४० ते ५० फुटांवर गेल्याने ताुलक्यातील हजारो हेक्टरमधील बागा ठिंबक सिंचनाव्दारे जगविण्याचा केविलवाणा प्रयत्न संत्रा उत्पादकांनी सुरू केला आहे.
तालुक्यात २१ हजार ५०० हेक्टर शेतजमीन संत्रालागवडीखाली आहे. त्यापैकी १७ हजार हेक्टर जमिनीत फळधारणा करणारी आणि पाच वर्षांपर्यंतची पाच हजारांपेक्षा अधिक संत्राझाडे आहेत. गहू, हरभरा, मका, मिरची, पालेभाज्यांसह इतरही बागायती पिके घेण्यात येतात. या पिकांनासुध्दा वेळेवर सिंचनाची आवश्यकता असते. तालुक्यात ९ सिंचन प्रकल्प आहेत. पंरतु १०० टक्के जलसंचयीत प्रकल्पांमध्ये केवळ १५ ते २० टक्केच जलसाठा उरला आहे. मार्चपूर्वीच प्रकल्प सुकायला लागले होते. भूजल पातळीत कमालीची घसरण होऊन बोअरचे पाणी ७०० ते ८०० फुटांवर गेले तर विहिरीची पातळी ४० ते ५० फुटांवर गेली. दिवसभर उपसा करणाऱ्या विहिरी आता केवळ अर्धा तासच उपसा करू लागल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांना रात्री- बेरात्री ओलिताकरिता शेतावर जावे लागते. तालुक्यात ५०० पेक्षा अधिक संत्रा कलमा तयार करणारे नर्सरीधारक आहेत. यावर्षीसुध्दा त्यांनी कोट्यवधी कलमांची लागवड केली आहे.
आंबिया बहार आणि मृग बहाराची संत्राफळे टिकवायची कशी? हा प्रश्न निर्माण झाला. तालुक्यातील तीव्र पाणीटंचाईच्या अस्मानी संकटाला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत असल्याने पुढच्या काळात लाखो संत्राझाडांसह कोट्यवधी रुपयांच्या संत्राकलमा मृत्यूच्या दाढेत जाण्याची शक्यता आहे. तालुक्यातील प्रकल्पांत केवळ १२ ते १५ टक्के जलसाठा कायम आहे. यंदाही शेतकऱ्यांची स्थिती विदारक होणार, असे जाणकारांचे मत आहे.(तालुका प्रतिनिधी)

ड्रायझोनमुळे नवीन विहीर खोदण्यावर बंदी
वरुड तालुक्यात भूूगर्भातील पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणावर झाला आहे. भूजल पातळी खोल गेल्याने अतिशोषित भाग भूजल सर्वेक्षण विभागाने घोषित केला. यामुळे नवीन विहिरी, बोअर करण्यावर कायदेशीर बंदी आहे. ऐनवेळी पाण्याचे स्त्रोत कोरडे पडल्यास शेतकऱ्याकडे कोणताही पर्याय उरत नाही. हजारो संत्रा झाडे आणि लाखो संत्रा कलमा मृत्यूच्या सापळयात जाण्याची शक्यता आहे.

कलमा उत्पादकांनाही लाखो रुपयांचा फटका
वरुड तालुक्यात संत्रा बागांसह ५०० पेक्षा अधिक नर्सरीधारक आहेत. यामध्ये अधिकृत परवानाधारक सुध्दा आहेत. कोट्यवधी रुपयांच्या संत्रा, मोसंबी कलमांचे उत्पादन घेतले जाते. परंतु यंदा भूजलपातळीसुध्दा खालावली आहे. पाण्याच्या संकटामुळे हजारो संत्रा कलमा तसेच हजारो हेक्टरमधील संत्रा बागा सुकण्याच्या मार्गावर आहेत.

Web Title: On the Santragga Salinwar in Varud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.