ऑटोरिक्षाचालकांना १,५०० रुपये सानुग्रह अनुदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:14 AM2021-06-09T04:14:55+5:302021-06-09T04:14:55+5:30
अमरावती : कोरोनाकाळातील संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर दुर्बल घटकांना विविध प्रकारचे सहाय्य करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. त्या अनुषंगाने ऑटोरिक्षा परवानाधारकांना ...
अमरावती : कोरोनाकाळातील संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर दुर्बल घटकांना विविध प्रकारचे सहाय्य करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. त्या अनुषंगाने ऑटोरिक्षा परवानाधारकांना दीड हजार रुपये अनुदान देण्यात येत आहे. या योजनेतही पात्र परवानाधारकांनी अर्ज करून सानुग्रह अनुदानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी सोमवारी केले.
सानुग्रह अनुदान वितरणाचा शुभारंभ ना. ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी झाला. ऑटोरिक्षाचालक अनिल कदम, मो. एजाज नासिर व प्रशांत खांडे यांना शुभारंभप्रसंगी अनुदान वितरित करण्यात आले. जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.
कोविड काळात विविध क्षेत्रांपुढे अनेक अडचणी उभ्या राहिल्या. त्या दूर करण्यासाठी विविध योजना- उपक्रमांची अंमलबजावणी शासनाकडून होत आहे. ज्या ऑटोरिक्षाचालकांनी अद्यापही सानुग्रह अनुदानासाठी अर्ज केले नाहीत, त्यांनी तातडीने अर्ज करावेत. प्रशासनाने ही प्रक्रिया गतीने राबवावी व कुणी वंचित राहू नये, यासाठी सर्वंकष प्रयत्न करावे, रिक्षाचालकांना परिपूर्ण माहिती देऊन व्यवस्थित अर्ज भरून घ्यावेत जेणेकरून त्रुटी राहता कामा नये. असे पालकमंत्र्यांनी सांगितले.
बॉक्स
अमरावती विभागात १३,२०८ नोंदणीकृत रिक्षा
विभागात एकूण १३,२०८ रिक्षा नोंदणीकृत आहेत. अमरावती जिल्ह्यात ५,८१५, बुलडाणा ९२५, यवतमाळ १,१२३, अकोला ४,४४३ रिक्षा व वाशिम जिल्ह्यात ९०२ रिक्षा नोंदणीकृत आहेत. त्यापैकी अमरावती २,१८९, बुलडाणा ६१९, यवतमाळ ५५९, अकोला २,७०३ व वाशिम जिल्ह्यात १४३ असे एकूण ६,२१३ अर्ज प्राप्त आहेत. यापैकी ४,१९३ अर्ज मंजूर करण्यात आले असून, उर्वरित अर्जांबाबतही प्रक्रिया होत असल्याचे सांगण्यात आले.