प्रखर उन्हामुळे सुकली दुभाजकांवरील रोपटी
By admin | Published: April 2, 2016 12:08 AM2016-04-02T00:08:54+5:302016-04-02T00:08:54+5:30
उन्हामुळे मनुष्यांच्या अंगाची लाहीलाही होत असतानाच झाडे-झुडूपेदेखील कोमेजू लागली आहेत.
पुरेशा देखभालीची गरज : अन्यथा शहर सौंदर्यीकरणाचे निघणार वाभाडे
अमरावती : उन्हामुळे मनुष्यांच्या अंगाची लाहीलाही होत असतानाच झाडे-झुडूपेदेखील कोमेजू लागली आहेत. रस्ता दुभाजकांमध्ये सौंदर्यीकरणासाठी लावलेली झाडे कोमेजू लागली आहेत.
झाडांना योग्य वेळी पाणी न मिळाल्यामुळे झाडे सुकायला लागतात. महापालिकेच्या उद्यान विभागाचे व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या झाडांच्या संगोपनाकडे दुर्लक्ष असल्याचे निदर्शनास येत आहे. शहरातील काही रस्ते महानगरपालिकेचे तर काही रस्ते हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अख्तयारित येतात. रस्त्यांच्या मधोमध असलेल्या दुभाजकांवर सौंदर्यीकरणाच्या दृष्टिकोनातून सुंदर वृक्ष लावण्यात आले आहेत. परंतु या वृक्षांना नियमित पाणी टाकणे गरजेचे आहे. परंतु लाखो रूपये खर्च करून झाडांचे संवर्धन केले जात नाही. इर्विन रुग्णालय ते रेल्वे स्टेशन मार्ग, पंचवटी चौक ते इर्विन रुग्णालय, गाडगेनगर ते कठोरा नाका पंचवटी ते मालटेकडी या मार्गावरील दुभाजकांवर झाडे लावली आहेत. परंतु त्यांच्यावर अवकळा आली आहे.
फुटलेल्या कुंड्या केव्हा उचणार?
महापालिकाचे स्मार्टसिटीकडे वाटचाल सुरु आहे. पण, काही कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे शहराचे सौंदर्यीकरण धुळीस मिळत आहे. ठिकठिकाणी फुटलेल्या कुंड्या तशाच पडून आहेत. या कुंड्यांमध्ये काटेरी झाडे वाढलेली आहेत. काही मार्गावरील फुटलेल्या कुंड्या महापालिकेने उचलल्या आहेत. परंतु अनेक मार्गावरील परिस्थिती जैसे थै आहे. सुंदर शहर करण्यासाठी सुंदर वृक्ष लावून त्याचे संवर्धन करणे आवश्यक आहे. लावलेली झाडे जगविण्याकरिता महापालिकेने विशेष परिश्रम घ्यावेत, अशी मागणी नागरिकांच्यावतीने केली जात आहे.
महापालिकेचे टँकर लावण्यात आले आहेत. उन्हाळ्यात टँकर्सची संख्या वाढविली जाईल.
- प्रमोद येवतीकर,
उद्यान अधीक्षक, महापालिका .