सरपंचांना पाहावी लागते ग्रामसवेकांची वाट !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:13 AM2021-03-31T04:13:37+5:302021-03-31T04:13:37+5:30
अमरावती : जिल्ह्यातील नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये वर्षानुवर्षे सत्ता राखून बसलेल्या दिग्गजांचा पराभव करीत अनेक ठिकाणी तरुणांनी ग्रामपंचायतीतील ...
अमरावती : जिल्ह्यातील नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये वर्षानुवर्षे सत्ता राखून बसलेल्या दिग्गजांचा पराभव करीत अनेक ठिकाणी तरुणांनी ग्रामपंचायतीतील सत्ता मिळविली. मात्र अनेक गावांमध्ये पूर्णवेळ ग्रामसेवक नसल्याने गावगाडा समजण्यासाठी मोठी कसरत सुरू असल्याचे चित्र सध्या जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत दिसून येत आहे.
जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, अचलपूर, चांदूर बाजार, मोर्शी, वरूड, तिवसा, नांदगाव खंडेश्वर, धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे, अमरावती, भातकुली, या १२ तालुक्यातील अनेक गावांमध्ये पूर्णवेळ ग्रामसेवक नसल्याने लोकांची कामे करून घेण्यासाठी नवनिर्वाचित सरपंचांची मोठी कसरत होत आहे. एका ग्रामसेवकाकडे दोन-तीन गावांचा कारभार असल्यामुळे नेमका किती वेळ, कोणत्या गावासाठी द्यायचा, याबाबत ग्रामसेवकांचीही डोकेदुखी वाढत चालली आहे. नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून गावकऱ्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. पदाधिकाऱ्यांनाही ग्रामविकासाची इच्छा आहे. लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी कंबर कसली आहे. ग्रामसेवक ग्रामीण विकासात महत्त्वाची भूमिका बजावत असतात. मात्र, सध्या ग्रामपंचायतींना पूर्णवेळ ग्रामसेवक नसल्याने लोकांची अनेक कामे रखडली आहेत. त्यामुळे सेवारत गाव सोडून ग्रामसेवकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. मार्चअखेर सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांची मोठी धावपळ होताना दिसून येते. अशातच कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता, स्थानिक नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी प्रत्येक गावासाठी पूर्णवेळ ग्रामसेवक असावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
बॉक्स
ऑनलाईन कामामुळे ग्रामसेवकांची दमछाक
घरकुल योजना, ग्रामविकास आराखडा, जॉब कार्ड योजना यांसारख्या अनेक योजना ऑनलाईन पद्धतीने झाल्यामुळे ग्रामसेवकांना अनेक कामांचे रेकाॅर्ड ऑनलाइन अपलोड करणे अनिवार्य केले आहे. त्यामुळे प्रत्येक कामाच्या ठिकाणी जाताना ग्रामपंचायतदप्तरी कामकाज करताना ग्रामसेवकांची मोठी दमछाक होत असल्याचे पाहावयास मिळत आहे.
बॉक्स
५१० पैकी ७३ पदे रिक्त
जिल्ह्यातील ८४० ग्रामपंचायतींसाठी ५१० पदे मंजूर आहेत. त्यापैकी ४३२ पदे भरली असून, ७३ पदे रिक्त आहेत. यामध्ये धारणी व चिखलदरा तालुक्यांचा अपवाद वगळला, तर अमरावती ५,भातकुली ४,नांदगाव खंडेश्वर व चांदूर रेल्वे प्रत्येकी ६,धामणगाव रेल्वे ९, तिवसा ५, मोर्शी ३, वरूड ४, चांदूृर बाजार ५, अचलपूर ७, अंजगाव सुर्जी १०, दर्यापूर ९ या प्रमाणे पदे रिक्त आहेत. तीन हजार लोकसंख्येवरील ११ गावांमध्ये ग्रामविकास अधिकाऱ्यांची पदे भरलेली नाहीत.
कोट
निवडणुकीनंतर लोकांच्या कामांची अपेक्षा वाढल्या आहेत. त्यांची कामे योग्य वेळेत होणे गरजेचे आहे. मात्र, पूर्णवेळ ग्रामसेवक नसल्याने या कामात अडचणी निर्माण होत आहेत. गावासाठी पूर्णवेळ ग्रामसेवक दिले असून, नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी भर देता येईल.
- विपिन अनोकार, सरपंच
कोट
ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांची पदे रिक्त असल्यामुळे उपलब्ध ग्रामसेवकांवर व ग्रामविकास अधिकाऱ्यांना अतिरिक्त ग्रामपंचायतींची जबाबदारी आहे. त्यामुळे ग्रामसेवकांची रिक्त पदे भरणे गरजेचे आहे तीन हजार लोकसंख्येच्या वरील जी गावे आहेत, त्या गावांना ग्रामविकास अधिकारी पदे मंजूर करणे आवश्यक आहे.
- कमलाकर वनवे, जिल्हाध्यक्ष, ग्रामसेवक युनियन