ग्रामसेवेचा ध्यास.. चालक न मिळाल्याने सरपंच स्वतः कचरा गाडीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2022 02:17 PM2022-01-25T14:17:15+5:302022-01-25T14:25:27+5:30
३२ वर्षे सीमेवर देशाची सेवा करून निवृत्त झाल्यावर ग्रामसेवेचा ध्यास घेतलेले सरपंच सुधाकर मानकर गेल्या दोन दिवसांपासून स्वतः कचरा गाडी फिरवून गावातील कचरा गोळा करण्याचे काम करीत आहेत.
प्रशांत काळबेंडे
अमरावती : जरूड गावातील कचरा गोळा करणाऱ्या वाहनासाठी चालक मिळत नसल्याने आपले गाव स्वच्छ राहावे या हेतूने माजी सैनिक असलेले सरपंच सुधाकर मानकर हे स्वतः या वाहनावर चालक बनून दोन दिवसांपासून गावातील गल्लीबोळात फिरून कचरा गोळा करीत आहेत. या कार्याबद्दल त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.
जिल्ह्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून लौकिकप्राप्त जरूड गावाचे सरपंचपद गेल्या दोन वर्षांपासून माजी सैनिक सुधाकर मानकर भूषवित आहेत. आपल्या सरपंचपदाच्या पहिल्या दिवसापासून ‘गावाचा विकास, तर देशाचा विकास’ या भावनेने प्रेरित आलेल्या सुधाकर मानकर यांनी कार्यास सुरुवात केली. व आज ऑक्सिजन पार्क, रोपवाटिका, दिवाळीच्या दिवशी पूर्वजांची आठवण म्हणून स्मशानभूमीत दिव्यांची आरास, कोरोनाकाळात प्रत्येक रुग्णाच्या घरी जाऊन त्यांची आस्थेने चौकशी, गावाच्या साफसफाईसाठी आणि विकासासाठी कचरा पेटीचे घरोघरी जाऊन वाटप करताना टॅक्स जमा विनंती करताना अत्यंत गरीब व्यक्तीचा टॅक्स आणि त्याला मदत स्वतःच्या खिशातून करणे आदी कारणांनी ते तालुक्यातील प्रत्येकाच्या कौतुकास पात्र व्यक्ती ठरले आहेत. ३२ वर्षे सीमेवर देशाची सेवा करून निवृत्त झाल्यावर ग्रामसेवेचा ध्यास घेतलेले सरपंच सुधाकर मानकर गेल्या दोन दिवसांपासून स्वतः कचरा गाडी फिरवून गावातील कचरा गोळा करण्याचे काम करीत आहेत.
सरपंच झाल्यापासून गावातील प्रत्येक नागरिकाचे स्वास्थ निरोगी राहावे, उत्तम सुविधा उपलब्ध व्हाव्यात, याची जबाबदारी माझी आहे. कचरा गाडीवर चालक नसल्याने मी स्वतः कचरा गाडी घेऊन फिरतो, यात कमीपणा नाही. कोणतेही काम छोटे वा मोठे नाही. गावची सेवा करताना एक सैनिक म्हणून देशसेवाच करीत असतो.
- सुधाकर मानकर, सरपंच, जरूड