सरपंच-उपसरपंचात हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 11:23 PM2019-02-25T23:23:06+5:302019-02-25T23:23:22+5:30
सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला पुन्हा कामावर ठेवल्याचा वाद सोमवारी वलगाव ग्रामपंचायत येथील आमसभेत उफाळून आला. यात महिला सरपंच व उपसरपंचात हाणामारी होऊन कार्यालयात तोडफोड झाल्याने एकच खळबळ उडाली. याप्रकरणात वलगाव पोलिसांनी उपसरंपचाविरुद्ध गुन्हा नोंदवून, त्यांना अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
टाकरखेडा संभू : सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला पुन्हा कामावर ठेवल्याचा वाद सोमवारी वलगाव ग्रामपंचायत येथील आमसभेत उफाळून आला. यात महिला सरपंच व उपसरपंचात हाणामारी होऊन कार्यालयात तोडफोड झाल्याने एकच खळबळ उडाली. याप्रकरणात वलगाव पोलिसांनी उपसरंपचाविरुद्ध गुन्हा नोंदवून, त्यांना अटक केली.
वलगाव येथील सेवानिवृत्त कर्मचारीच्या निवडीवरून ग्रामपंचायतीत सरपंच मोहिनी विठ्ठल मोहोड (४०) व उपसरपंच महेश गुलाबराव उकटे (४७) यांच्यात सोमवारी आमसभेत हाणामारी झाली. सोमवारी सकाळी ११ वाजता आमसभेत विविध विषयावर चर्चा सुरू असताना सरपंच मोहिनी मोहोड यांनी कृष्णराव तायडे यांच्या नियुक्तीचा मुद्दा मांडला. तायडे हे ग्रामपंचायत येथे वीज कर्मचारी पदावर कार्यरत होते. परंतु ते काही दिवसांपूर्वी सेवानिवृत्त झाल्याने गावातील पथदिव्याचे काम रखडले होते. त्यामुळे सरपंच मोहिनी मोहोड यांनी तायडे यांची रोजंदारीवर नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला. परंतु उपसरपंच उकटे यांनी तायडेच्या नियुक्तीवर आक्षेप घेतला. त्यामुळे मोहोड व उकटे यांच्यात वाद झाला. या वादाचे रूपांतर लवकरच हाणामारीतही झाले. शिवीगाळ आणि भांडणाने ग्रामपंचायत कार्यालय दणाणून गेले होते. याप्रकरणी सरपंच मोहीम मोहोड यांनी तत्काळ वलगाव पोलीस ठाणे गाठून उपसरपंचांनी शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी उपसरपंचाविरुद्ध गुन्हा दाखल केला. मात्र, ग्रामपंचायतीत झालेल्या या हाणामारीच्या घटनेमुळे वलगावातील वातावरण तापले होते.
उपसरपंचाच्या अटकेची मागणी
उपसरपंचांना त्वरित अटक करा, अशी मागणी करीत सरपंच यांच्या शेकडो समर्थकांनी वलगाव बस स्थानककासमोर टायर जाळून चक्क जाम करण्याचा प्रयत्न सुरू केला. रस्त्यावर टायर जाळल्याने त्या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. अचानक झालेल्या जाळपोळीमुळे वाहतुकीचा खोळंबा झाला होता. पोलिसांनी घटनास्थळ गाठून परिस्थिती आटोक्यात आणली.
३० जणांवर गुन्हा
टायर जाळल्याप्रकरणी वलगाव पोलिसांनी २० ते २५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर उपसरपंच यांनी देखील पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. मात्र त्यांनी तक्रार दिली नसल्याची माहिती आहे.
पोलिसांनी केले दुकान बंद
ग्रामपंचायतील वादानंतर सरपंच यांच्या समर्थकांनी रस्त्यावर चक्काजामचा प्रयत्न केला. वलगाव पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर तणाव निवळला. नागरिकांचा रोष पाहता, काही व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली. अप्रिय घटना घडू नये, म्हणून पोलिसांनी दुकाने बंद केली
ग्रामपंचायत सभेत सरपंच व उपसरपंचात वाद झाला. महिला सरपंचाच्या तक्रारीवरून उपसरपंचाविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. टायर जाळणाऱ्यांविरुद्धही कारवाई करण्यात आली असून वलगावात शांततापूर्ण वातावरण आहे.
यशवंत सोळंके,
पोलीस उपायुक्त