सरपंचपद एससी महिलेसाठी; पण उमेदवारच नाही !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:13 AM2021-02-07T04:13:14+5:302021-02-07T04:13:14+5:30
वरुड : गुरुवारी तालुक्यातील ६६ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे २०२५ पर्यंतचे आरक्षण जाहीर झाले. परंतु काही ग्रामपंचायतींमध्ये त्या आरक्षित संवर्गाचा ...
वरुड : गुरुवारी तालुक्यातील ६६ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे २०२५ पर्यंतचे आरक्षण जाहीर झाले. परंतु काही ग्रामपंचायतींमध्ये त्या आरक्षित संवर्गाचा उमेदवारच नसल्याने ते पद रिक्त राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तालुक्यातील वघाळ या सात सदस्यीय ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदाचे आरक्षण अनुसूचित जाती महिलेसाठी आरक्षित करण्यात आले. मात्र, तेथे अनुसूचित जातीची महिला सदस्य म्हणून निवडून न आल्याने सरपंच पद रिक्त राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शेतकरी शेतमजूर पॅनल बहुमतात असून सुद्धा त्यांचेकडे सरपंचासाठी आरक्षित उमेदवार नसल्याने उपसरपंचावर कारभार चालविण्याची वेळ येणार आहे. तेथे नितीन आंजीकर, वैशाली शेंगोळे, पंकज कावनपुरे, जया राऊत, अर्शिया शफिउल्लाखा पठाण, सागर हरले व शाह शबनम वसीम हे निवडून आले. नवनिर्वाचित सदस्यांमध्ये अनुसूचित जातीची एकही महिला नाही. यामुळे वघाळचे सरपंच पद रिक्त राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.