सरपंचांनी केली स्वच्छता, सचिवांवर होणार कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 11:39 PM2018-05-14T23:39:38+5:302018-05-14T23:39:38+5:30
एका बालकाचा डेंग्यूने मृत्यू, तर सहा संशयित रुग्ण आदर्श ग्राम झाडा गावात आढळल्यानंतर आरोग्य प्रशासन जागे झाले. बेपत्ता असलेल्या सचिवावर कारवाईचे आदेश जिल्हा परिषदेने दिले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव रेल्वे : एका बालकाचा डेंग्यूने मृत्यू, तर सहा संशयित रुग्ण आदर्श ग्राम झाडा गावात आढळल्यानंतर आरोग्य प्रशासन जागे झाले. बेपत्ता असलेल्या सचिवावर कारवाईचे आदेश जिल्हा परिषदेने दिले आहेत.
ग्रामसचिव बेपत्ता असल्याने राज्यात अव्वल ठरलेल्या व ११२ पुरस्कारांची नोंद असलेल्या आदर्श ग्राम झाडा येथे अस्वच्छता वाढली. परिणामी डेंग्यूचा फैलाव झाला. यात सहा महिन्याच्या बालकाचा मृत्यू झाला. झाडाच्या सरपंच शुभांगी चौधरी यांनी ज्या भागात डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळले, त्या परिसरात अनेक दिवसांपासून पाण्याने भरलेले मडके सोमवारी फोडले. ग्रामस्थांना स्वच्छता ठेवण्याचे आवाहन सरपंचांनी केले. आरोग्य कर्मचारी दुर्लक्ष करीत असल्याने डेंग्यू बळावल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
सचिवांवर वेळकाढूपणाचा आरोप
राज्यात सर्वप्रथम आदर्श ठरलेल्या झाडा ग्रामपंचायतीचे रेर्कार्ड अद्ययावत ठेवण्याचे काम सचिवाचे आहे. मात्र, येथील सचिव केवळ वेळकाढूपणा करीत असल्याचा आरोप काही ग्रामस्थांनी केला आहे. संबंधित सचिवाची खातेनिहाय चौकशी करण्याची मागणी जिल्हा परिषदेकडे लेखी तक्रारीत केली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी या सचिवाला पाठबळ देतात की कारवाई करतील, हे दिसणार आहे.