सासरी खूप सोसलं, आता माहेरी चाललोय !

By admin | Published: February 24, 2016 12:19 AM2016-02-24T00:19:22+5:302016-02-24T00:19:22+5:30

‘सासरी खूप छळ झाला.. खूप सोसलं..आता सासूरवास संपवून माहेरी चाललोय’, अशा शब्दांत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे मावळते कुलगुरू मोहन खेडकर यांनी

Sasari fell too much, now she is going to mother! | सासरी खूप सोसलं, आता माहेरी चाललोय !

सासरी खूप सोसलं, आता माहेरी चाललोय !

Next

मोहन खेडकर : आता तरी शेलक्या विशेषणांनी संबोधू नका
प्रदीप भाकरे अमरावती
‘सासरी खूप छळ झाला.. खूप सोसलं..आता सासूरवास संपवून माहेरी चाललोय’, अशा शब्दांत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे मावळते कुलगुरू मोहन खेडकर यांनी त्यांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळातील एकूण घडामोडींवर 'लोकमत'ला मंगळवारी बोलकी प्रतिक्रिया दिली.
एरवी कोणत्याही आरोप-प्रत्यारोपांवर, कोणत्याही प्रकरणात कधीच आक्रमक होऊन ‘कमेंट’ न देणारे कुलगुरू कार्यकाळ संपवून निघताना मात्र भरभरून बोललेत. आतापर्यंत दाटलेले सारे मळभ त्यांनी मोकळे केले. ते म्हणाले, माझ्या कार्यकाळात अनेक आंदोलने झालीत, शेकडो आरोप झालेत. मात्र, मी स्थितप्रज्ञ राहिलो. कारण, माझा माझ्या कामावर विश्वास होता.
आपल्या कार्यकाळात सर्वात जास्त आंदोलने झालीत. आरोपही सर्वाधिक आपल्यावरच झालेत? या प्रश्नाच्या उत्तरादाखल ते म्हणाले, असे असेलही कदाचित. पण, यापूर्वी विद्यापीठाला ‘अ’ मानांकनसुद्धा मिळाले नाही, हे वास्तव आहे ना, असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. मंगळवारी खेडकरांना निरोप देण्यात आला. तत्पूर्वी ते ‘लोकमत’शी भरभरुन बोलले. ‘अ’ मानांकनामुळे १०० - १५० कोटींचे अनुदान विद्यापीठाला मिळेल. त्याचा लाभ निश्चितच विद्यार्थ्यांना होईल, याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. कुलगुरुपदाच्या खुर्चीवर बसताना काही गोष्टी अपेक्षित होत्या. मात्र, मला त्यापलीकडे सहन करावे लागले. त्यावर मात करीत ‘अ’ मानांकन मिळविणे, हीच माझ्या स्थितप्रज्ञतेची आणि कार्यकर्तृत्वाची पावती नाही का? मात्र, तसे लिहितानाही कंजूषपणा केला जातो. आता तरी मृणाल खेडकर गुणवाढ प्रकरण, बांधाबांध भत्ता, सक्तीची रजा ही विशेषणे मागे टाकून ‘अ’ श्रेणीने गौरवान्वित अमरावती विद्यापीठ असा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा उल्लेख व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

विद्यापीठाची बदनामी कशासाठी?
मोहन खेडकरांना ‘टार्गेट’ करून आंदोलने करण्यात आलीत. बदनामी कुणाची, विद्यापीठाचीच ना? विद्यापीठ कुणाचे? मी तर चाललोय.. मग विद्यापीठाची बदनामी कशासाठी? याचा विचार व्हायला हवा, अशी अपेक्षा खेडकरांनी व्यक्त केली. पाच वर्षांत आपण कधीही ‘डीए’ घेतला नाही. दोनदा स्वखर्चाने परदेशात गेलो. मात्र, ही बाजू समोरच आली नाही, असे स्पष्ट करून शेलक्या विशेषणांनी आता तरी विद्यापीठाला हिणवू नका, असे आर्जव त्यांनी केले.

‘मोस्ट शेमफुल डे इन माय लाईफ’
कुलगुरुंच्या कार्यालयात एखाद्या विद्यार्थी संघटनेने आंदोलने करावीत; तथापि माझ्या कुटुंबीयांसमोर आणि पोलिसांच्या उपस्थितीत एखाद्या विद्यार्थी नेत्याने शासकीय निवास्थानात घुसखोरी करण्याचा प्रसंग अत्यंत लाजिरवाणा आहे. ही बाब विचारशील समाजासाठी प्रश्नचिन्ह आहे. तसेच इट ईज ‘मोस्ट शेमफुल डे इन माय लाईफ’ असे ते खेदाने म्हणाले.

नागपूर हे माहेर !
पाच वर्षांपूर्वी नागपूर येथील व्हीएनआयटीमधून मोहन खेडकर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात कुलगुरू म्हणून रुजू झाले होते. ते मंगळवारी रात्री नागपूरसाठी रवाना होणार आहेत. सासरी खूप सोसलंय. आता परत माहेरी चाललोय. कुठलीही खंत नाही, अशा भावना व्यक्त करीत कुलगुरू कक्षाच्या बाहेर पडले. लवकरच ते व्हीएनआयटीतील इलेक्ट्रीकल विभागात ‘प्रोफेसर’ म्हणून रुजू होणार आहेत.

Web Title: Sasari fell too much, now she is going to mother!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.