सातेफळ पं. स. गणासाठी रविवारी मतदान, १४ केंद्रांवर ११ हजार मतदार बजावणार हक्क
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2023 09:22 PM2023-12-16T21:22:25+5:302023-12-16T21:24:06+5:30
या पोटनिवडणुकीसाठी मतदान केंद्रांवर संबंधित मतदान पथके शनिवारी दुपारी पोहोचल्याचे जिल्हा निवडणूक विभागाने सांगितले.
अमरावती : चांदूररेल्वे पंचायत समितींतर्गत सातेफळ गणासाठी तीन उमेदवार रिंगणात आहे. यासाठी रविवारी १४ मतदान केंद्रांवर १०,९०५ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या पोटनिवडणुकीसाठी मतदान केंद्रांवर संबंधित मतदान पथके शनिवारी दुपारी पोहोचल्याचे जिल्हा निवडणूक विभागाने सांगितले.
सातेफळ गणातील १४ मतदान केंद्रांवर रविवारी सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० पर्यंत मतदान होणार आहे. पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसच्या प्रीती तिजारे, भाजपच्या शुभांगी भालकर व शिवसेना (उबाठा) गटाच्या सुरेखा चौधरी या तीन उमेदवार आहेत. मतदानाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवार, १८ डिसेंबरला सकाळी १० पासून चांदूर रेल्वे येथे मतमोजणी होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा एसडीओ रवींद्र जोगी व सहा. निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार पूजा माटोडे यांच्या मार्गदर्शनात पोटनिवडणुकीची तयारी पूर्ण झालेली आहे.
सातेफळ क्षेत्रातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, याकरिता रविवार १७ डिसेंबरला इतर सर्व आस्थापना (ज्यांना सुटी लागू होत नाही) त्यांच्या आस्थापनेवरील क्षेत्रातील रहिवासी असलेले अधिकारी, कर्मचारी, मजूर, कामगार यांना मतदान करता येणे शक्य व्हावे. याकरिता कामाच्या तासातून दोन तासांची सवलत देण्याचे आदेश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी शुक्रवारी दिले आहेत.
सातेफळ गणात समाविष्ट गावे
सातेफळ, धनोडी, टेंभुर्णी, अमदोरी, निमला, कळमजापूर, चांदूर वाडी, राजना, बागापूर, सुपलवाडा, सांगूलवाडा, ईस्माईलपूर, वाई, शिरसगाव कोरडे, वडगाव भट, मांडवा, लसनापूर, तुळजापूर, दिलावरपूर, धनापूर या गावांच्या क्षेत्रात निवडणूक होत आहे. यामध्ये पुरुष ५४९४, स्त्री ५४११ असे एकूण १०९०५ मतदार मतदान करतील.