रानफुलांनी बहरल्या सातपुडाच्या पर्वतरांगा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2023 12:17 PM2023-06-09T12:17:26+5:302023-06-09T12:23:13+5:30

लाल, पांढऱ्या, हिरव्या, पिवळ्या, निळ्या, केशरी रंगांची उधळण : विविध आजारांवर उपयुक्त

Satpura mountain range blooming with wildflowers | रानफुलांनी बहरल्या सातपुडाच्या पर्वतरांगा

रानफुलांनी बहरल्या सातपुडाच्या पर्वतरांगा

googlenewsNext

नरेंद्र जावरे

चिखलदरा (अमरावती) : वसंत ऋतूच्या आगमनाची चाहुल लागण्यापूर्वीच मेळघाटच्या जंगलात विविधरंगी पाने, फुले, फळांनी वनश्री डोळ्यांचे पारणे फेडणारी अशी बहरली आहे. बहुगुणी वनौषधीमध्ये मोडणारी विविध प्रजातींची फुले, पाने, फळे यांचा अनेक कठीण मानवी व्याधींवर रामबाण म्हणून आजही उपयोग केला जात आहे.

जैवविविधतेने नटलेल्या सातपुडा पर्वतरांगांवर वसलेल्या मेळघाटच्या घनदाट अरण्यात वाघ, अस्वल, गवे, बिबट, ससा ते जलचर प्राणी - कीटकांचा मुक्त संचार आहे. विविधरंगी शेकडो प्रजातींची झाडे - वेली आहेत. आयुर्वेदशास्त्रात बहुगुणी व दुर्मीळ असणाऱ्या वनौषधींचा खजिना येथील सिपना महाविद्यालयात वनस्पतिशास्त्राच्या प्राध्यापक डॉ. उज्ज्वला गजानन मुरतकर (कोकाटे) यांनी ‘लोकमत’शी बातचीत करताना उलगडला.

वन्यप्राण्यांच्या अन्नसाखळीत कीटक ते वाघ असले तरी गवत ते वृक्षवेली विविध वृक्षांची पाने, फुले, फळे ती साखळी पूर्ण करण्यात महत्त्वाचा वाटा उचलतात. जानेवारी ते जून महिन्यापर्यंत वनस्पतींना नवी फुले, पाने येतात. लाल, पांढऱ्या, हिरव्या, पिवळ्या, निळ्या, केशरी रंगांची उधळण यावेळी असते.

१८ प्रकारची फुले, फळे, अनेक दुर्मीळ

२१ मार्च ते मृग नक्षत्रापर्यंत अनेक प्रकारची फुले-फळे मेळघाटच्या जंगलात बहरतात. त्यामध्ये प्रामुख्याने पळसफुलांचा उपयोग मनुष्याच्या किडनी आजारावर केला जातो. बाहावा किंवा कांचन, रक्त कांचन फुलांची भाजी आदिवासी भागात खाल्ल्या जाते. यामुळे प्रोटीनचे प्रमाण शरीरात सर्वाधिक वाढते. निळा गुलमोहर परिसराचे सौंदर्य वाढवितो. जैवदर्शिका असलेली भांडार ही वनस्पती लाल मातीत, थंड भागात उगवते. फुलाचा सर्दीसाठी, तर पानाचा उपयोग शरीरातील हाड जोडण्यासाठी होतो.

पाणथळ भागातील भोकर या वनस्पतीची पाणीदार फळे (तहान लाडू) खाऊन अस्वल सांबर चितळ गवे प्राणी तहान भागवितात. वनौषधीमध्ये पान-फुलांचा उपयोग होतो. रानचिक्कू (तेंदू, बिडीपत्ता) वनस्पती या जंगलात विपुलतेने आढळते. फूल व फळांचा उपयोग साखर, फायबर मिळविण्यासाठी होतो. अमलतास (स्वर्णक्षरी) ची फुलं, बिया अस्वल मोठ्या प्रमाणात खातात. फुलांची भाजी चविष्ट होते. भेऱ्या ही वनस्पती समुद्रसपाटीपासून उंच असलेल्या मेळघाटातील जंगलात पांढऱ्या फुलांमुळे आकर्षित करते. वड, पिंपळ, उंबर ही अदृश्य फूल असणारी वनस्पती, तर रान अंजीर कीटकांना आकर्षित व त्यांचे प्रजनन करणारी वनस्पती आहे. सेक्स हार्मोन तयार करणाऱ्या ऑर्किड वनस्पतीच्या पांढऱ्या, लाल, निळ्या फुलांचा कालावधी २२ दिवस असतो. फुलोरा पाऊस येणार आहे, याचा निदर्शक आहे.

मेळघाट जैवविविधतेने नटलेला प्रदेश आहे. मानवी शरीरातील विविध व्याधींवर उपयुक्त अशी वनस्पती येथे मोठ्या प्रमाणात आहे. जानेवारी ते जून महिन्यापर्यंत त्यांना बहर येतो.

- प्रा.डॉ उज्ज्वला मुरतकर, सिपना महाविद्यालय, चिखलदरा

Web Title: Satpura mountain range blooming with wildflowers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.