२० जुलैला प्रतियुतीचा योग; विलोभनीय कड्याचा शनी पृथ्वीच्या समीप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 01:52 PM2020-07-16T13:52:27+5:302020-07-16T13:52:56+5:30
प्रतियुतीच्या आसपास पृथ्वी - शनि हे अंतर सरासरी कमी असते . त्यामुळे या काळात शनीची सुप्रसिद्ध सुंदर रिंग अगदी चांगल्या प्रकारे दिसू शकते.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सूर्यमालेतील सर्वात सुंदर विलोभनीय रिंग असणारा शनि ग्रह २० जुलै रोजी पृथ्वीच्या जवळ राहील. २० जुलै रोजी शनि ग्रह अगदी सूर्यासमोर राहील. या घटनेला खगोलशास्त्रात प्रतियुती असे म्हणतात. प्रतियुतीच्या आसपास पृथ्वी - शनि हे अंतर सरासरी कमी असते . त्यामुळे या काळात शनीची सुप्रसिद्ध सुंदर रिंग अगदी चांगल्या प्रकारे दिसू शकते. ही रिंग साध्या डोळ्यांनी दिसू शकत नाही.
२० जुलै रोजी पृथ्वी - शनी हे अंतर १३४ कोटी ६० लक्ष कि.मी. राहील. याआधी ९ जुलै २०१९ रोजी शनी - सूर्य प्रतियूती झाली होती. शनीला एकूण ८२ चंद्र असून सर्वात मोठा चंद्र टायटन हा आहे. या ग्रहाला सूर्याभोवती एक चक्कर मारण्यास २९.५ वर्षे लागतात. या ग्रहाचा व्यास १,२०,००० की.मी. आहे. तापमान शून्याखाली १८० अंश सेंटीग्रेड आहे. या ग्रहाची घनता सर्वात कमी आहे. शनीची रिंग २ लाख ७० हजार किमी. पर्यंत पसरलेली आहे. ही रिंग बर्फाची आहे. शनिचे वस्तूमान पृथ्वीच्या ९५ पट आहे. पृथ्वी ज्यावेळी शनीच्या विषुववृत्त पातळीत असते. अशा वेळी शनीचे कडे पृथ्वीवरून चांगल्या प्रकारे दिसू शकत नाही, अशी माहिती मराठी विज्ञान परिषदेचे प्रवीण गुल्हाने व विजय गिरुळकर यांनी दिली.