चांदोबामागे उद्या काही वेळासाठी लपणार शनी

By गजानन उत्तमराव मोहोड | Published: July 23, 2024 05:27 PM2024-07-23T17:27:33+5:302024-07-23T17:38:48+5:30

खगोलीय घटना : २४ जुलै रोजी रात्री ११:११ ला अनुभवता येणार

Saturn will hide behind moon for some time today | चांदोबामागे उद्या काही वेळासाठी लपणार शनी

Tomorrow Saturn will hide behind moon for some time

गजानन मोहोड
अमरावती :
ग्रहमालेत २४ जुलै रोजी रात्री ११:११ वाजता चंद्र व शनी एकाच रेषेत राहणार आहेत. साधारणपणे ३० मिनिटांपर्यंत ही खगोलीय घटना अनुभवता येणार असल्याची माहिती खगोल अभ्यासकांनी दिली.

शनी ग्रह पृथ्वीपासून ७९३ दशलक्ष मैल म्हणजे १.३ अब्ज किलोमीटर लांब असून, या ग्रहाचा व्यास १,१६,४६० किमी आहे. तर चंद्राचा व्यास ३,४७८ किमी असून, पृथ्वीपासून ३,८२,१४४ किलोमीटर अंतरावर आहे. शनी ग्रह चंद्रापेक्षा मोठा असला तरी चंद्र जवळ असल्यामुळे पृथ्वीवरून चंद्रबिंब मोठे तर शनी दूर असल्यामुळे त्याचे बिंब लहान दिसते. त्यामुळे शनी ग्रह चंद्राच्या मागे पूर्णपणे झाकला जाईल.

२४ जुलैच्या रात्री, चंद्र, सुमारे ८० टक्के प्रकाशित असेल. यावेळी चंद्र स्वतः कुंभ नक्षत्रात (कुंभ राशीत) असेल. लंबवर्तुळाकार मार्गाने पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालणारा चंद्र २४ जुलै रोजी रात्री ११:११ वाजता त्याचे सर्वात जवळच्या अंतरावर म्हणजे ‘पेरीजी’ ओलांडतो. तेव्हा ही घटना सुरू होईल. खगोल निरीक्षकांनी शनीबिंब चंद्राबिंबाच्या मागे जाण्याच्या वेळेच्या किमान ३० मिनिटे आधी निरीक्षण सुरू करावे, ही संपूर्ण घटना ३० मिनिटे राहील. चंद्राद्वारे शनीला ग्रहण हा एका साखळीचा भाग आहे. ही घटना साधारणपणे दर १८ महिन्यांनी होते.

या घटनेमुळे आकाश निरीक्षक आणि खगोलशास्त्रज्ञांना खगोलीय पिंडांच्या वेगाचा अभ्यास करण्याची संधी मिळणार आहे. सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे ही घटना पाहण्याची अनुभवण्याची संधी मिळणे कठीण आहे. परंतु आकाश निरभ्र राहिल्यास नक्कीच अनुभवता येणार असल्याची माहिती मराठी विज्ञान परिषदेचे विभागीय अध्यक्ष प्रवीण गुल्हाने व हौशी खगोल अभ्यासक विजय गिरुळकर यांनी दिली.

काय आहे पिधान युती?
चंद्र पृथ्वीभोवती फिरत असताना सूर्य आणि पृथ्वी या मधोमध चंद्र आला की हा चंद्र सूर्याला ज्याप्रमाणे काही वेळासाठी झाकतो तेव्हा आपण त्याला ‘सूर्यग्रहण’ असे म्हणतो. बहुदा सर्वच ग्रह कमी जास्त फरकाने सूर्याभोवती एकाच पातळीमध्ये फिरतात. त्यामुळे रात्रीच्या आकाशात चंद्राचा मार्ग आणि ग्रहांचा मार्ग हा एकसारखा आहे. परंतु जेव्हा एखादा ग्रह आणि चंद्र एकाच पातळीत येतो, तेव्हा अशा प्रकारची घटना अनुभवता येते. त्याला पिधान युती म्हणतात. तसेच काहीसे शनीसोबत घडणार आहे. अर्थात या ठिकाणी सूर्याएवजी शनी या ग्रहाला पिधान होणार आहे.

Web Title: Saturn will hide behind moon for some time today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.