विलोभनीय कडी असणारा ‘शनी’ ८ ला पृथ्वीच्या जवळ
By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: September 2, 2024 16:47 IST2024-09-02T16:46:16+5:302024-09-02T16:47:10+5:30
खगोलीय घटना : प्रतियूतीमध्ये पृथ्वी-शनी यांच्यातील अंतर कमी

'Saturn' with a spectacular edge close to Earth on the 8th Sept
गजानन मोहोड
अमरावती : सूर्यमालेतील सर्वात सुंदर विलोभनीय रिंग असणारा शनी ग्रह ८ सप्टेंबरला पृथ्वीच्या अगदी जवळ राहील. या घटनेला खगोलशास्त्रात प्रतियुती म्हणतात. प्रतियुतीच्या दरम्यान पृथ्वी-शनी यांच्यातील सरासरी अंतर कमी असते. त्यामुळे या काळात शनीची सुंदर रिंग चांगल्या प्रकारे दिसू शकते. ही रिंग साध्या डोळ्यांनी दिसू शकत नाही. याकरिता टेलिस्कोपची आवश्यकता असल्याचे खगोल अभ्यासकांनी सांगितले.
पृथ्वी ज्या वेळी शनीच्या विषववृत्त पातळीत असते. अशा वेळी शनीचे कडे पृथ्वीवरून चांगल्या प्रकारे दिसू शकत नाही. शनीचा अभ्यास करणारे महिले मानवरहित यान ‘कॅसिनी’ हे आहे. व्हायेजर या मानवरहित यानानेसुद्धा शनीचे जवळून छायाचित्र घेतले आहे. ८ सप्टेंबरला सूर्य मावळल्यानंतर लगेच हा ग्रह पूर्व क्षितिजावर उगवेल आणि पश्चिमेला मावळेल, हा ग्रह रात्रभर आकाशात दिसेल.
हा ग्रह काळसर व पिंगट रंगाचा अगदी चमकदार असल्याने सहज ओळखता येईल. परंतु या ग्रहाची प्रसिद्ध रिंग साध्या डोळ्यांनी दिसू शकणार नाही. याकरिता टेलिस्कोपची आवश्यकता आहे. हा ग्रह पृथ्वीच्या जवळ आल्याने मानवी जीवनावर कोणताही परिणाम होणार नाही. याआधी २७ ऑगस्ट २०२३ रोजी शनी ग्रह पृथ्वीच्या जवळ आला होता, अशी मराठी विज्ञान परिषदेचे अमरावती विभागीय अध्यक्ष प्रवीण गुल्हाने व हौशी खगोल अभ्यासक विजय गिरुळकर यांनी दिली.
शनीला ८२ चंद्र, सर्वात मोठा टायटन
शनीला एकूण ८२ चंद्र असून सर्वात मोठा चंद्र टायटन आहे. या ग्रहाला सूर्याभोवती एक चक्कर मारण्यास २९.५ वर्षे लागतात. या ग्रहाचा व्यास १.२० लाख किमी आहे. तापमान शून्याखाली १८० अंश सेंटिग्रेड आहे. या ग्रहाची घनता सर्वात कमी आहे. शनीची रिंग ही बर्फाची आहे. शनीचे वस्तुमान पृथ्वीच्या ९५ पट असल्याचे गिरुळकर यांनी सांगितले.