राष्ट्रसंतांचा अंतिम संदेश पोहोचणार सातासमुद्रापार
By admin | Published: October 31, 2015 01:06 AM2015-10-31T01:06:08+5:302015-10-31T01:06:08+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सन १९६८ मध्ये त्यांच्या शेवटच्या पत्रात नमूद केले होते की एक दिवस गुरुदेव सेवा मंडळाची ‘शिक्षा व दीक्षा’ संपूर्ण जग आत्मसात करेल.
अमरावती : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सन १९६८ मध्ये त्यांच्या शेवटच्या पत्रात नमूद केले होते की एक दिवस गुरुदेव सेवा मंडळाची ‘शिक्षा व दीक्षा’ संपूर्ण जग आत्मसात करेल. या तत्त्वज्ञानाचा प्रसार, प्रचार करणारे विद्वान देश, विदेशातून आपोआपच एक दिवस अवतीर्ण होतील. राष्ट्रसंतांनी ४६ वर्षांपूर्वी केलेले हे भाकित आज खरे ठरले आहे. अमेरिकेतील प्रख्यात लेखक,
कॉर्पोरेट प्रेरक विल हॅरीस यांच्या रुपाने साकार होत आहेत. ३१ आक्टोबर रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना आदरांजली अर्पण करण्यासाठी अमरिकेवरून ‘विल पॉवर नाऊ’ या बेस्ट सेलर पुस्तकाचे लेखक, वंचित मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणारे प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते विल हॅरीस हे सपत्नीक आणि काही विदेशी विद्वानांसह गुरुकुंज आश्रमात दाखल झाले आहेत.
विल हॅरीस राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या साहित्याचा अभ्यास करण्यासाठी २०१५ च्या मे महिन्यात गुरुकुंज आश्रमात आले होते. त्यावेळी त्यांना गुरुदेव सेवा मंडळाचे उपसर्वाधिकारी व राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या साहित्याचे गाढे अभ्यासक रुपराव वाघ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे तत्कालीन सचिव जनार्दनपंत बोथे, राजाराम बोथे यांनी राष्ट्रसंताबद्दल संपूर्ण माहिती दिली होती. हॅरीस अमेरिकेत परत गेल्यावर त्यांनी अमेरिकेच्या ‘एनएफसी फॉल’ या चर्चमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेवर भाषण दिले होते. त्या भाषणाचे प्रसारण अमेरिकेतील दूरचित्र वाहिन्या व रेडीयोवरूनही करण्यात आले होते. विल हॅरीस राष्ट्रसंताच्या साहित्यामुळे भारवल्याने त्यांनी ‘वुई आर वन’ हे पुस्तक लिहिले असून त्यामध्ये राष्ट्रसंतांच्या साहित्यातील वैश्विक भूमिका मांडण्यात आली आहे.