सावर्डीची हागणदारीमुक्तीकडे वाटचाल
By admin | Published: January 11, 2016 12:14 AM2016-01-11T00:14:51+5:302016-01-11T00:14:51+5:30
स्वच्छ भारत मिशनचा एक महत्त्वपूर्ण भाग असलेल्या हागणदारीमुक्त गावाकडे अमरावती तालुक्यातील सावर्डी या गावाने वाटचाल सुरू केली आहे.
समितीने केली पाहणी : तालुक्यातील एकमेव गाव
नांदगाव पेठ : स्वच्छ भारत मिशनचा एक महत्त्वपूर्ण भाग असलेल्या हागणदारीमुक्त गावाकडे अमरावती तालुक्यातील सावर्डी या गावाने वाटचाल सुरू केली आहे. राज्यस्तरीय समितीने केलेल्या पाहणीतून सकारात्मक निकाल येण्याची चिन्हे आहे.
शुक्रवारी राज्यस्तरीय हागणदारीमुक्त समिती सकाळी १० वाजताच सावर्डीला पोहोचली, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व गाडगेबाबा यांच्या फोटोचे पूजन करून समितीने संपूर्ण गावाची तपासणी केली. पथकाचे प्रमुख गजानन काकड, बी. एम. बोरडे, नीलेश नागपूरकर, धनंजय तिरमारे, विस्तार अधिकारी देशमुख यांनी तपासणीच्या व पडताळणीच्या अनुषंगाने शाळा, अंगणवाडी, समाज मंदिर स्वच्छता, पिण्याचे पाणी, वैयक्तिक शौचालय सांडपाणी व घनकचरा याबाबत गावफेरीतून संपूर्ण माहिती घेतली व गावकऱ्यांना प्रश्नावलीच्या माध्यमातून मार्गदर्शन केले.
समितीने याबाबत सरपंच राहुल उके व गावकऱ्यांचे भरभरून कौतुक केले. एकंदरीत स्वच्छ भारत मिशनमध्ये सावर्डीने स्थान मिळविले असून दिल्ली येथील पथकाच्या तपासणीनंतर सावर्डी गाव हागणदारीमुक्त घोषित करण्यात येईल.
राज्यस्तरीय समितीने हिरवी झेंडी दिली आता शेवटचा टप्पा लवकरच पूर्ण होईल. यावेळी पथकासोबतच उपसरपंच नलिनी मेश्राम, ग्रामसेविका स्वाती कांडलकर, रिता मेश्राम, चंद्रभान गोंडाने, सयाबाई मेश्राम, राधा मेश्राम, सावित्रीबाई मेटांगे, पो. पा. नरेंद्र मेश्राम, रिहान खाँन, माणिक खोब्रागडे यांच्यासह गावकरी उपस्थित होते. (वार्ताहर)
सरपंचपदाचे सूत्र हाती घेतल्यापासून सावर्डीचा विकास हेच ध्येय असल्याने पहिल्याच दिवसापासून स्वच्छतेवर अधिक भर दिला आहे. गावकऱ्यांच्या सहकार्याने संपूर्ण हागणदारी नष्ट केली. आज प्रत्येकाच्याच घरी शासन योजनेचे शौचालये आहेत. त्यामुळे उशीरा का होईना आमच्या परिश्रमाचे हे फलितच आहे.
- राहुल उके, सरपंच, सावर्डी.