प्राण वाचविले, नंतर काठी उगारून काढले ठाण्याबाहेर शहर कोतवाली पोलिस ठाण्यातील घटना, वंचितांचे ऐकणार तरी कोण?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:10 AM2021-07-03T04:10:02+5:302021-07-03T04:10:02+5:30
प्राण वाचविले, नंतर काठी उगारून काढले ठाण्याबाहेर शहर कोतवाली पोलीस ठाण्यातील घटना, वंचितांचे ऐकणार तरी कोण? अमरावती : ...
प्राण वाचविले, नंतर काठी उगारून काढले ठाण्याबाहेर शहर कोतवाली पोलीस ठाण्यातील घटना, वंचितांचे ऐकणार तरी कोण?
अमरावती : राजकमल चौकाच्या रेल्वे पुलावरून ताब्यात घेतलेल्या महिलेला पोलीस ठाण्यात आणून रात्री आठच्या सुमारास हाकलून देण्यात आले. तिने काही सांगण्यापूर्वी काठी उगारून तिला पिटाळून लावण्यात आले. हा प्रकार कॅमेऱ्यात कैद होत असल्याची कल्पना आल्याने काठी शांत झाली. मात्र, तिला दैव नेईल तिकडे जाण्यास बाध्य करण्यात आले.
अमरावती मुंबई अंबा एक्स्प्रेस निघण्याच्या मुहूर्तावर पुलावरून उडी घेऊन जीव देण्याचा प्रयत्न भटक्या समाजातील एका महिलेने गुरुवारी रात्री सातच्या सुमारास केला होता. अवघ्या पाच वर्षांच्या तिच्या मुलाने हालचाली ओळखून गलका केला. त्यामुळे नागरिक व पोलिसांच्या सीआर व्हेन यांनी तिचा हा आत्महत्येचा प्रयत्न हाणून पाडला. यानंतर तिला शहर कोतवाली पोलीस ठाण्यात नेण्यात आले. राजकमल वा अन्य महत्त्वाच्या चौकात भीक मागून वास्तव्य करणाऱ्या समाजातील या महिलेकडे यामुळेच पोलिसांनी नेहमीच्या सवयीनुसार दुर्लक्ष केले. अगदी जुजबी चौकशीदेखील तीच्या कडून करण्यात आली नाही रात्री आठच्या सुमारास तिला येथून बाहेर काढण्यात त्यांनी धन्यता मानली. ती काही सांगण्याचा प्रयत्न करीत होती. मात्र, तिला बाहेर काढण्यात आले आणि पोलीस ठाण्याबाहेर जाण्याचे दरडावून सांगत एका कर्मचाऱ्याने काठी उगारली. तिच्यासोबत चिमुकला होताच. आईला मारहाण होणार, याची कल्पना आलेल्या त्या मुलाने रडणे सुरु केले. यादरम्यान हा प्रसंग चित्रित होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे काठी उगारलेल्या कर्मचाऱ्याला थांबवून आणि महिलेला काहीबाही समजावून अन्य कर्मचाऱ्यांनी पोलीस ठाण्याबाहेर काढले.
बॉक्स
वंचितांचे ऐकणार कोण?
स्वच्छ अमरावती सुंदर अमरावतीचे ब्रीद मिरवणाऱ्या महापालिकेच्या पुढ्यात सर्वांकडून उपेक्षित अशी कुटुंबे राहतात. जगण्याचे भान नसलेल्या या कुटुंबांमध्ये पुरुष -महिलांना विविध व्यसनाधीनता जडली आहे. त्यांचे योग्य प्रबोधन व पुनर्वसन झाल्यास आणि मुलांना शिक्षणाची संधी मिळाल्यास अशी मानहानी त्यांच्या वाटेला येणार नाही. याकरिता जबाबदारीचे भान ठेवून सामूहिक प्रयत्न होणे गरजेचे आहे.