सावरखेडवासीयांचे पंचायत समितीच्या कक्षात ठिय्या आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:17 AM2021-09-05T04:17:05+5:302021-09-05T04:17:05+5:30
घरकुल यादीतून पात्र लाभार्थींना डावलले, ६ सप्टेंबरला मिळणार लेखी हमी मोर्शी : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत पात्र ठरलेल्या लाभार्थींच्या यादीतून ...
घरकुल यादीतून पात्र लाभार्थींना डावलले, ६ सप्टेंबरला मिळणार लेखी हमी
मोर्शी : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत पात्र ठरलेल्या लाभार्थींच्या यादीतून काहींना ग्रामपंचायतच्या अनागोंदी कारभारामुळे डावलण्यात आले. त्याच्या निषेधार्थ सावररखेडवासीयांनी पंचायत समितीच्या कक्षात ठिय्या आंदोलन सुरू केले होते. पात्र लाभार्थींना घरकुल योजनेत समाविष्ट करण्यात येणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतल्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ६ सप्टेंबरला लेखी हमी देण्याच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
मोर्शी तालुक्यातील सावरखेड येथील केंद्र शासनाच्या पंतप्रधान आवास योजनेंतर्गत २६८ लाभार्थींची घरकुल यादी निश्चित करण्यात आली होती. ग्रामपंचायतला पाठविलेल्या यादीत ७६ नावे कमी झाली. या अन्यायाच्या विरोधात शेकडो संतप्त नागरिक पंचायत समितीच्या कार्यालयावर येऊन धडकले. त्यांनी पंचायत समितीच्या कक्षेत ठिय्या आंदोलन सुरू केले. जोपर्यंत या 76 लाभार्थ्यांना घरकुल योजनेत समाविष्ट करण्यात येणार नाही, तोपर्यंत येथून हलणार नाही, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतल्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ६ सप्टेंबर रोजी लेखी हमी देण्याचे आश्वासन मिळाल्याने तूर्तास आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र, यापुढे बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारासुद्धा देण्यात आला आहे.
महेश राऊत, आकाश बायस्कार, शिवाजी भुंबर, बाळू ठवळी, गणेश धर्माळे, मयूर राऊत, चंदू काळेकर, दिगंबर जोमदे, नीलेश टारफे, प्रमोद काळबांडे, विलास डहाणे, नंदू ठवळी, बबलू वानखडे, अक्षय वानखडे, रामेश्वर आवारे यांच्यासह शेकडो आंदोलनकर्ते उपस्थित होते.