पाण्यासाठी 'त्यांनी' सोडलं गाव.. उपसरपंचानं पाणीपुरवठा बंद केल्याचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2022 03:35 PM2022-02-03T15:35:10+5:302022-02-03T16:31:11+5:30
पिण्याचे पाणी मिळत नसल्याने ग्रामस्थांना आपले गाव सोडावे लागल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मागास वस्ती असल्यामुळे उपसरपंचाने जाणीवपूर्वक हे कृत्य केल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे.
अमरावती : जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगी मग्रापूर या गावातील वार्ड क्रमांक १ मधील लोकांना पाण्यासाठी गाव सोडावं लागल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यांच्या प्रभागात तब्बल २८ दिवसांपासून पाणीच येत नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. या विरोधात त्यांनी गावाच्या वेशीवर ठिय्या आंदोलन पुकारले आहे.
बुधवारी रात्रीपासून त्यांनी गावावर बहिष्कार टाकत आंदोलन सुरू केले आहे. गावाच्या इतर भागात नियमित पाणी पुरवठा होतोय. मात्र, मागास वर्गाची वस्ती असलेल्या वाॅर्ड १ मध्ये ग्रामपंचायतीकडून सुडाचे राजकारण करीत असल्याचा आरोप महिलांनी तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना दिलेल्या तक्रारीतून केला आहे.
तक्रारीनुसार, सावंगी मग्रापूर येथील वॉर्ड १ मध्ये ९० टक्के दलित बांधव राहतात. तथापी, बोटावर मोजता येईल एवढ्यांकडे नळ आहेत. अनेकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते. त्यामुळे, ग्रामस्थांनी नळ कनेक्शनसाठीची मागणी केली. वेळोवेळी ग्रामपंचायत, पंचायत समिती, तहसीलदार, पोलीस ठाणे व जिल्हाधिकारी यांच्यासमोर समस्या मांडल्या; मात्र कोणीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यातच २८ दिवसांपासून वार्डातील संपूर्ण पाणीपुरवठा बंद झाला. याबाबत विचारणा करण्यास गेल्यावर उडवाउडवीची उत्तरे मिळाली, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
या गावातील अनेक लोकं आपल्या कुटुंबासोबत गावाबाहेरील विहिरीजवळ बसले आहेत. यामध्ये वयोवृद्धांपासून लहान मुलांपर्यंत सर्वांचाच समावेश आहे. पिण्याचे पाणी मिळत नसल्याने आम्हाला आपले गाव सोडावे, लागल्याचे त्यांचे म्हणणे आहे. बुधवारी रात्रीपासून या नागरिकांनी या विहिरीजवळ ठिय्या मांडला आहे. जोपर्यंत आम्हाला पिण्याचं पाणी मिळत नाही तोपर्यंत आम्ही येथून हटणार नसल्याचा, पवित्रा या लोकांनी घेतला आहे.