म्हणे, गोडेतील नदीत वाहून गेले; अपघाताचा केला बनाव, दोघांना अटक

By प्रदीप भाकरे | Published: January 12, 2024 07:23 PM2024-01-12T19:23:31+5:302024-01-12T19:24:07+5:30

दोन आरोपींना अटक : परस्पर विकले २३ लाखांचे तेल, कारही जप्त फोटो आहेत

Say, washed away in the river in Gode, make it an accident in amravati | म्हणे, गोडेतील नदीत वाहून गेले; अपघाताचा केला बनाव, दोघांना अटक

म्हणे, गोडेतील नदीत वाहून गेले; अपघाताचा केला बनाव, दोघांना अटक

अमरावती : गोडेतेल वाहून नेणाऱ्या ‘त्या’ टॅंकरला अपघात झाला नसून चालकाने अन्य एकाशी संगणमत करून अपघाताचा बनाव केल्याचा उलगडा पोलिसांनी केला आहे. आरोपींनीच टॅंकरमधील गोडेतेल विकल्यानंतर अपघाताचा बनाव रचल्याचे महिनाभराच्या तपासानंतर उघड झाले आहे. याप्रकरणी, तळेगाव दशासर पोलिसांनी दोघांना अटक केली. १२ जानेवारी रोजी ही कारवाई करण्यात आली.            

दिलीपकुमार यादव (५०, रा. मुंबई) व अमोल इंगळे (३०, रा. भुसावळ, जि. जळगांव) अशी अटक आरोपींची नावे असून, त्यांच्या ताब्यातुन टँकर, गोडतेल विक्रीतील ८ लाख ३ हजार ७०० रुपये रोख व कार असा एकुण ३८ लाख ३ हजार ७०० रूपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. तळेगांव दशासर हद्दीत ६ डिसेंबर २०२३ रोजी घुईखेड नजीकच्या चंद्रभागा नदीच्या पुलावर एमएच१२ क्यु डब्ल्यू ०८७५ या टॅंकरला अपघात होऊन ते वाहन नदीपात्रात पडल्याची घटना घडली होती. तो टॅंकर गोडेतील घेवून ब्रम्हपुरीहून जळगांव येथे जात असल्याची माहिती समोर आली होती. मात्र, घटनास्थळाची पाहणी केली असता तो अपघात बनावट असल्याचा संशय पोलिसांना आला.

चालकाच्या उलटतपासणीत फुटले बिंग

संशय आल्याने तळेगाव पोलिसांनी ब्रम्हपुरी येथील त्या कंपनीचे व्यवस्थापक शेख जाहेद हुसेन यांच्याशी संपर्क साधला. तथा टॅंकरचालक इंद्रजीत यादव (३९, सुलतानपुर, उत्तरप्रदेश) याची उलटतपासणी घेतली. चौकशीदरम्यान इंद्रजीत यादव व ट्रान्सपोर्टर टँकरचा मालक दिलीपकुमार यादव यांनी संगनमत करून त्या टॅंकरमधील २३.२५ लाख रुपये किमतीचे २५ मेट्रिक टन गोडेतेल अन्यत्र विक्री करून कंपनी मालकाचा विश्वासघात करून अपहार केला असल्याचे निष्पन्न झाले. २१ डिसेंबर रोजी रामदेव बाबा साल्वंट, ब्रम्हपुरी कंपनीचे व्यवस्थापक शे. जाहीद हुसेन यांच्या तक्रारीवरून देखील अपहाराचा गुन्हा दाखल केला होता.

असा केला बनाव

चालक इंद्रजीत यादव व दिलीपकुमार यादव यांनी ते गोडतेल अमोल इंगळे यास विक्री केले. ती चोरी उघड होऊ नये म्हणून टॅंकरला अपघात होऊन ते गोडतेल नदीपात्रात वाहून गेल्याचा बनाव केला होता. यातील चालकाचा पोलिसांनी शोध चालविला आहे. तळेगावचे ठाणेदार रामेश्वर धोंडगे यांच्या नेतृत्वात उपनिरिक्षक दादाराव पंधरे, अंमलदार सचिन गायधने, संदेश चव्हाण, गौतम गवळी, मेघा चवडे यांनी ही कारवाई केली.

Web Title: Say, washed away in the river in Gode, make it an accident in amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.