एसबीआय खातेदारांची गोपनीय माहिती लीक?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 11:38 PM2017-10-17T23:38:57+5:302017-10-17T23:39:18+5:30
एक-एक पैसा जुळवून बँकेत जमा करणाºया नागरिकांच्या खात्यातून परस्पर पैसे काढून घेतले जात असल्याच्या पाच घटना शहरात उघड झाल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : एक-एक पैसा जुळवून बँकेत जमा करणाºया नागरिकांच्या खात्यातून परस्पर पैसे काढून घेतले जात असल्याच्या पाच घटना शहरात उघड झाल्या आहेत. खात्याची माहिती केवळ बँक व खातेदारांशिवाय अन्य कोणालाही नसते. असे असताना खात्यातून परस्पर पैसे काढले जातात तरी कसे, असा प्रश्न खातेदारांना पडला आहे. एसबीआयकडून गोपनीय माहिती लीक होत असल्याचा आरोप खातेदारांनी केला आहे.
चंदननगरातील रहिवासी गोपाल विनायक इंगळे यांच्या बँक खात्यातून २७ सप्टेंबर रोजीपर्यंत १ लाख २७ हजारांची रोख लंपास झाली. त्यानंतर कोतवाली, राजापेठ ठाण्याच्या हद्दीत दोन घटनांमध्ये एसबीआय खातेदारांचे पैसे खात्यातून लंपास झाले. गाडगेनगर ठाण्यातही तक्रारींचा ओघ सुरु झाला आहे. एका महिला पोलिसाच्या खात्यातून पैसे चोरी गेले. सोमवारी पुन्हा दोन घटना गाडगेनगरच्या एसबीआय शाखेतील खातेदारांसोबत घडल्या. एका महिलेच्या खात्यातून १ लाख २० हजार व संतोष नामक तरुणाच्या खात्यातून २३ हजारांची रोख लंपास झाली. फोनवरून एटीएमचा पासवर्ड वा ओटीपी क्रमांक मागितला नसतानाही बँक खात्यातून रोख काढल्याचा हा प्रकार खातेदारांना संभ्रमित आहे. काही खातेदार गाडगेनगरातील बँकेकडे व्यथा मांडण्यास गेले असता याबाबत बँक अधिकारी अनभिज्ञ असल्याचे आढळून आले. या पैशांची हेराफेरी करणाºयांचा शोध पोलीस घेत आहेत. मात्र, अद्याप त्यांचे हात आरोपींपर्यंत पोहोचले नाहीत. या घटनांमुळे खातेदारांचा बँकेवरील विश्वास उडाल्याचे दिसून येत आहे.
खातेदारासोबत घडलेले किस्से
गोपाल इंगळे इंजिनिअर असून, ते एसबीआयचे खातेदार आहेत. त्यांच्या खात्यातून १ लाख २७ हजार लंपास झाले. याबाबत त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. रविवारी पुन्हा त्यांच्या बँक खात्यातून २३ हजारांची रोख वळती झाल्याचा एक संदेश प्राप्त झाला. नेमका प्रकार जाणून घेण्यासाठी ते गाडगेनगरच्या एसबीआय शाखेत गेले. त्याठिकाणी आधीच संतोष नामक तरुण २३ हजार खात्यातून गेल्याची ओरड करीत होता. संतोषच्या खात्यातील २३ हजार गोपाल इंगळेच्या खात्यात वळते झाल्याचे विवरण बँकेकडे होते. मात्र, गोपालच्या खात्यातून २३ हजारांची रोख गुडगाव (हरियाणा) येथून काढल्याचा संदेश गोपालला आला.
मानसिक त्रासाने खातेदार हैराण
एसबीआयच्या खातेदारांसोबत घडलेले हे प्रकार आश्चर्यचकित करणारे आहे. परिश्रमातून कमावलेला पैसा बँकेतही सुरक्षित नसल्याचा धक्का खातेदारांना वेदना देत असतानाच कुुटुंबात कलह सुरू झाले आहेत. गाडगेनगर हद्दीत एका महिलेच्या खात्यातून रक्कम परस्पर वळती केली गेली. पती पैशांचा हिशेब विचारेल आणि मारसुद्धा खावा लागेल, अशी भीती या महिलेला आहे. त्यातच खातेदारांना नियमित कामे सोडून बँक व पोलीस ठाण्यात चकरा घालाव्या लागत आहेत. काय करावे अन् काय नाही, अशी खातेदारांची स्थिती झाली असून ग्राहकांच्या पैशाबाबत एसबीआयचे नियंत्रण व सुरक्षितता काय, असा प्रश्न खातेदारांनी उपस्थित केला आहे.