टंचाईची तीव्रता वाढली; तीन गावांना चार टँकरने पाणीपुरवठा
By जितेंद्र दखने | Published: April 17, 2024 06:34 PM2024-04-17T18:34:29+5:302024-04-17T18:34:56+5:30
यंदा २१ कोटी १८ लाखांचा पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला आहे. जवळपास ७६७ गावे टंचाईच्या छायेत आहेत, चिखलदरा तालुक्यातील अनेक गावांमध्ये सध्या नागरिकांना गावाबाहेरून पाणी आणावे लागत आहेत.
अमरावती : एप्रिल महिन्यातच जिल्ह्यातील पाणीटंचाई तीव्रतेकडे वाटचाल करीत आहेत. चिखलदरा तालुक्यातील तीन गावांना चार टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू केला जात आहे. याशिवाय अनेक गावांता खासगी विहिरींचे अधिग्रहण करून नागरिकांची तहान भागविण्याचे काम प्रशासनाला करावे लागत आहे. येत्या काही दिवसांत आणखी काही गावांना टँकर लागण्याची शक्यता आहे.सध्या मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील चुर्णी, कोरडा आणि चुनखडी या तीन गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
विशेष म्हणजे मागील आठवड्यात केवळ एकाच गावाला टँकर होता. सहा किलोमीटर अंतरावरील एका गावात खासगी विहिरीचे अधिग्रहण करून तेथून टँकरद्वारे पाणी आणून ते तहानलेल्या गावांना दिले जात आहे. यंदा २१ कोटी १८ लाखांचा पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला आहे. जवळपास ७६७ गावे टंचाईच्या छायेत आहेत, चिखलदरा तालुक्यातील अनेक गावांमध्ये सध्या नागरिकांना गावाबाहेरून पाणी आणावे लागत आहेत. ३० गावांमध्ये खासगी विहिरींचे अधिग्रहण केले आहे. विशेष म्हणजे गतवर्षी अपेक्षेपेक्षा फारच कमी पावसाळा झाल्याने यंदा टंचाईची तीव्रता वाढणार हे गृहीत धरून कृती आराखड्यामध्ये ३० गावांना टँकरद्वाो पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले आहे. काही गावांमध्ये फेब्रुवारीपासूनच टंचाई जाणवत आहे.
या गावांना लागणार टँकर
चिखलदरा तालुक्यातील बगदरी, बेला, खिरपाणी, भीलखेडा, माखला, गवळीढोणा, भवई, खोगडा, रायपूर, आकी, मोथा, खडीमल, गौलखेडा बाजार, सोनापूर, मांजरकापडी, पाचडोंगरी, कोरडा, कारदा, बहाद्दरपूर, सोमवारखेडा, धरमडोह, एकझिरा, तर चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगी मग्रापूर, तिवसा तालुक्यातील काटसूर, इसापूर, तारखेडा, फत्तेपर या गावांना पुढील काही दिवसांत टँकर लागण्याची शक्यता आहे.